India China FaceOff: ...अन् बघता बघता भारतीय जवान उंच चौक्यांवर चढले; चिनी सैन्य हैराण होऊन पाहतच राहिले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 12:26 PM2020-09-01T12:26:15+5:302020-09-01T12:44:46+5:30

लडाखच्या सीमावर्ती भागातील तणाव कायम आहे. गेल्या ४ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने उभं ठाकलं आहे.

१५ जूननंतर २९-३० ऑगस्टला चिनी सैन्यानं पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी चिनी सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला.

एका बाजूला चिनी सैन्याचे घुसखोरीचे मनसुबे उधळून लावताना भारतीय जवानांनी काही महत्त्वाच्या जागांवरील आपली पकड आणखी मजबूत केली. त्यामुळे चीनची आगळीक भारताच्या पथ्यावर पडली आहे.

पँगाँग त्सो सरोवर परिसरातील काही मोक्याच्या जागांवरील भारताची पकड आणखी मजूबत झाल्याचं वृत्त 'द टेलिग्राफ'नं सुत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

भारतीय जवानांना चीनकडून असलेल्या धोक्याची कल्पना येताच त्यांनी लगेच तेथील चौक्यांवर पोझिशन्स घेतल्या. या चौक्यांचं भौगोलिक महत्त्व अतिशय मोठं आहे. त्यामुळे भारतीय जवानांना त्यांचा लाभ मिळाला.

चिनी सैन्यानं भारतीय जवानांच्या ताब्यात असलेल्या भागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न उधळला गेला.

चिनी सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून स्पेशल ऑपरेशन्स बटालियननं पँगाँग सरोवर जवळील डोंगराळ भागात तैनात आहे. त्यांची पकड आधीच्या तुलनेत आणखी मजबूत आहे.

भारतीय जवान आता पँगाँग त्सोच्या दक्षिण किनाऱ्यावरील उंच भागात तैनात आहेत. त्यामुळे चीनच्या तुलनेत भारतीय जवानांची पोझिशन उत्तम आहे.

चीनकडून घुसखोरी होणार असल्याची माहिती मिळताच भारतीय जवान उंचावर गेले. याचा फायदा त्यांना चीनची घुसखोरी रोखताना झाला.

पँगाँग सरोवरच्या उत्तर किनाऱ्यावर चिनी सैन्य फिंगर फोरमधील उंचावर जाऊन बसलं आहे. उंचीच फायदा घेण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू आहे.

दक्षिण किनाऱ्यावर भारतानं चीनला त्यांच्याच रणनीतीचा वापर करून प्रत्युत्तर दिलं आहे. दक्षिण किनाऱ्यावरील डोंगराळ भागात भारतीय जवानांनी उंच भागांवर पोझिशन्स घेतल्या आहेत.