देशातील शाळा सुरू केल्या नाहीत तर; रघुराम राजन यांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 04:52 PM2021-08-18T16:52:11+5:302021-08-18T17:10:54+5:30

यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. तर, डिजिटल शिक्षणप्रणाली परिणामकारक नसल्याचं सिद्ध झालंय.

कोरोना महामारीमुळे जवळपास गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. विशेष म्हणजे गतवर्षी इयत्ता 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षाही घेण्यात आल्या नाहीत.

बोर्डाकडून शासनाच्या समितीने ठरवलेल्या नियमावलीनुसार मार्क देऊन विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र सरकारने 17 ऑगस्टपासून राज्यातील 8 ते 12 वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात घोषणा केली होती. मात्र, अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे, अजूनही स्टडी फ्रॉम होमच सुरू आहे.

राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याबाबत अद्यापही निश्चितता नाही. त्यामुळे, मुलांच्या सर्वांगिण विकासाचा प्रश्न उद्भवत आहे.

विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी शाळा बंद असल्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. शाळांच्या मुद्यावरून गंभीर इशाराच त्यांनी दिला आहे.

शाळा पुन्हा सुरू करण्यास आणि मुलांच्या शिक्षणात गती आणण्यात आणखी बिलंब हा आगामी दशकांपर्यत देशासाठी त्रासदायक ठरू शकतो, असे राजन यांनी म्हटले आहे.

राजन यांनी क्विंट ग्रुपचे सह-संस्थापक राघव बहल यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल आणि शैक्षणिक क्षेत्राबद्दल मोठं विधान केलं आहे.

“मुलांना दीड वर्षांपासून काय शिकायला मिळालं आहे, याची कल्पना करा. समस्या फक्त एवढीच नाही की ते पुढे जात नाहीत, पण ते विसरतही आहेत.

जर तुम्ही दीड वर्षापासून शाळेबाहेर असाल, तर तुम्ही परत गेल्यावर कदाचित तीन वर्ष मागे असाल.”, असे राजन यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.

“मला खरोखरच आशा आहे की राज्य आणि केंद्र सरकार या मुलांना शाळेत परत कसे आणता येईल, विशेषत: गरीब घटकांबद्दल खूप विचार करत आहे. अन्यथा आपल्याकडे मुलांची एक हरवलेली पिढी आहे.”, असे राजन यांनी म्हटलं.

मार्च २०२० मध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून भारतातील शाळा बंद आहेत. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे यंदाच्या वर्षीही शाळा सुरू करण्याबाबतचा विचारही दुसऱ्या लाटेमुळे फोल ठरला.

यूनिसेफच्या मते शाळा बंद असल्याने देशभरातील जवळपास २५ कोटी मुलांवर याचा परिणाम झाला आहे. तर, डिजिटल शिक्षणप्रणाली परिणामकारक नसल्याचं सिद्ध झालंय.