युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 01:46 PM2020-05-27T13:46:59+5:302020-05-27T14:43:37+5:30

लडाखसह इतर सीमांवरून चीन आणि भारताचे संबंध टोकाचे ताणले आहेत. अशातच आता भारतीय हवाई दलाने आपल्या 18व्या स्क्वॉड्रनला सक्रिय केले आहे. यासंदर्भात खुद्द हवाई दल प्रमुख एअर मार्शल आरकेएस भदौरिया यांनीच आदेश दिला आहे.

भदौरिया यांनी सुलूर येथील 18व्या स्क्वॉड्रनमध्ये तैनात असलेल्या फ्लाइंग बुलेट्स म्हणजेच, हलके लढाऊ विमान एलसीए तेजसला सक्रीय राहण्यास सांगितले आहे. तीव्र आणि निर्भय, असे 18व्या स्क्वॉड्रनचे बोधवाक्य आहे. म्हणजे शत्रूपेक्षा वेगवान आणि न घाबरणारे.

भारतीय हवाई दलाने हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडकडून तेजसची खरेदी केली आहे. हवाई दलाने नोव्हेंबर 2016मध्येच 50,025 कोटी रुपयांत 83 तेजस मार्क-1एच्या खरेदीला मंजुरी दिली होती. अखेर 40 हजार कोटी रुपयांमध्ये हा व्यवहार झाला. म्हणजेच मागील किमतीपेक्षा 10 हजार कोटी रुपये स्वस्त.

सेंटर फॉर मिलिट्री एअरवर्थनेस अँड सर्टिफिकेशनने गेल्या वर्षी बंगळुरूमध्य एअरो इंडिया शोदरम्यान तेजसच्या अंतिम ऑपरेटिंगला मंजुरी दिली होती. यात तेजसच्या अनेक क्षमता पाहून ते हवाई दलासाठी उपयुक्त असल्याचे दिसून आले होते.

यानंतर हवाई दलासाठी 40 तेजस विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. यापैकी 18 तेजस भारतीय हवाई दलाला सोपवण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी सुलूरमध्ये एक स्क्वॉड्रन तयार करण्यात आली आहे.

तेजस विमान हे पाकिस्तान आणि चीनच्या संयुक्त उत्पादन थंडरबर्डपेक्षा कितीतरी पटीने दमदार आहेत. जेव्हा आंतरराष्ट्रीय स्थरावर तेजसच्या प्रदर्शनासंदर्भात चर्चा करण्यात आली होती, तेव्हा पाकिस्तान आणि चीनने थंडरबर्डला या प्रदर्शनातून बाजुला केले होते. ही घटना बहरीन इंटरनॅश्नल एअर शोमधील आहे. तेजस चौथ्या पीढीचे विमान आहे. तर थंडरबर्ड मिग-21मध्ये सुधारणा करून तयार करण्यात आले आहे.

तेजसमध्ये हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर माराकरण्याची क्षमता आहे. यात अँटीशिप मिसाईल, बॉम्ब आणि रॉकेटदेखील लावले जाऊ शकतात. हे विमान 42 टक्के कार्बन फायबर, 43 टक्के अॅल्यूमिनिअम अॅलॉय आणि टायटॅनियमने तयार करण्यात आले आहे.

तेजस हे सिंगल सीटर पायलट विमान आहे. मात्र, याचे ट्रेनर व्हेरिएंट 2 सीटर आहे. तेजस एका वेळेला तब्बल 54 हजार फूट उंचावर जाऊ शकते. LCA तेजस विकसित करण्यासाठी एकूण 7 हजार कोटी रुपये एवढा खर्च आला आहे.

असा आहे याचा वेग अन् ताकद - तेजस ताशी 2222 किमी वेगाने उडू शकते. ते एका वेळेला 3000 किमीपर्यंत जाऊ शकते. तेजसची लांबी 43.4 फूट, तर उंची 14.9 फूट एवढी आहे. सर्व शस्त्रांसह याचे वजन 13,500 किलो एवढे असते.

तेजसमध्ये हवेतून हवेत मारा करणारे 6 प्रकारचे मिसाइल्स तेनात होऊ शकतात. हे आहेत - डर्बी, पायथन-5, आर-73, अस्त्र, असराम, मेटियोर. 2 प्रकारचे हवेतून जमिनीवर मारा करणारे मिसाइल्स म्हणजे, ब्राह्मोस-एनजी आणि डीआरडीओ अँटी-रेडिएशन मिसाइल आणि ब्राह्मोस-एनजी अँटी शिप मिसाइल. या शिवाय यावर लेझर गायडेड बॉम्ब, ग्लाइड बॉम्ब आणि क्लस्टर वेपनही लावले जाऊ शकतात.

कधीकाळी देशाची शान असलेले मिग-21 विमाने आता जुनी झाली आहेत. यांच्यामुळे एअरफोर्सचे जवळपास 43 जवान शहीद झाले आहेत. यामुळे त्यांना फ्लाइंग कॉफिनसुद्धा म्हटले जात आहे. देशात गेल्या 45 वर्षांत जवळपास 465 मिग विमान पडले आहेत. तेही शत्रूशी न लढताच. युद्धाच्या मैदानात आतापर्यंत केवळ 11च मिग विमाने पडली आहेत.

देशासाठी नव्या विमानांची आवश्यकता पाहता 1980 मध्येच शक्तीशाली विमानाच्या तयारीला सुरू झाली होती. जवळपास, दोन दशकांची तयारी आणि विकासानंतर 4 जानेवारी 2001रोजी तेजसने पहिली झाप घेतली होती.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तयार केलेल्या विमानाला 'तेजस' हे नाव माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी दिले होते. हा एक संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ अत्यंत शक्तीशाली उर्जा, असा होतो. HALने हे विमान लाइट कॉम्बेट एअरक्राफ्ट (LCA) म्हणजे हलक्या युद्ध विमानाच्या प्रोजेक्टअंतर्गत तायार केले आहे.