मुख्यमंत्र्यांच्या 'कडक' निर्णयाला भज्जीचा फुल्ल सपोर्ट, नागरिकांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:03 AM2021-04-05T11:03:11+5:302021-04-05T11:08:04+5:30

आदित्य ठाकरेंचं ट्विट हरभजन सिंगने रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला फुल्ल सपोर्ट दर्शवला आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे संकेत दिले होते.

त्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाल्यानंतर राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात एसओपीही जारी करण्यात आली आहे.

राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू झाले असून आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी आणि रविवारी विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. सीएमओकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातून येत आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमांतून वारंवार राज्यात कडक निर्बंध लादत, लॉकडाऊनचे संकेत दिले होते.

याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग यानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या विधानावर रोखठोक भूमिका घेतली होती.

"लोक जर सांगूनही ऐकत नसतील तर लॉकडाऊन कराच. लोक केव्हा गांभीर्यानं मुद्दा समजून घेणार आहेत आणि कसा तेच कळत नाही", असा संताप हरभजननं व्यक्त केला होता.

महाराष्ट्रात आता कडक निर्बंध लागू करण्यात आले असून नागरिकांनी नवीन नियमावली पाळावी, असे आवाहन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरुन केले आहे.

आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरुन नवी निमयावलीही प्रसिद्ध केल असून ब्रेक द चेनची निमयावली पाळून सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केलंय.

आदित्य ठाकरेंचं हे ट्विट हरभजन सिंगने रिट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला फुल्ल सपोर्ट दर्शवला आहे.

हरभजनने आणखी एक ट्विट केलंय. त्यामध्ये, देशात दररोज 1 लाख रुग्ण आढळून येत आहेत. सर्वांच्या आरोग्यासाठी आपण प्रार्थना करुया, सर्वांनी सुरक्षित राहावे हीच विनंती, असे भज्जीनं म्हटलंय.