जलप्रलय आणि ३०० मीटर बोगद्यातील ते पाच तास, दुर्घटनेत वाचलेले कर्मचारी म्हणाले, तेव्हा वाटलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 08:15 AM2021-02-08T08:15:24+5:302021-02-08T08:22:11+5:30

Uttarakhand : उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून आलेल्या भीषण जलप्रलयामध्ये मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी अपघातानंतरचा भयावह अनुभव कथन केला आहे.

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमकडा कोसळून आलेल्या भीषण जलप्रलयामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. या जलप्रलयादरम्यान, दुर्घटनास्थळी अनेक लोक अडकले आहेत. त्यांना वाचवण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे या भयानक घटनेनंतर मृत्यूच्या दाढेतून वाचवण्यात आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी अपघातानंतरचा भयावह अनुभव कथन केला आहे.

चमोली येथील ढाक गावात राहणाऱ्या सूरजने सांगितले की, ही दुर्घटना होण्यापूर्वी एक मोठा आवाज आला. त्यानंतर आम्ही प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अडकून पडलो.

ढाक गावातीलच रहिवासी असलेल्या सुनीलने सांगितले की, ही दुर्घटना घडली तेव्हा आम्ही, बोगद्यामध्ये काम करत होतो. अचानक लोकांनी बाहेर या, बाहेर या म्हणून आरडा-ओरडा सुरू झाला. काय झालं ते आम्हाला कळत नव्हते. तेवढ्यात बोगद्यामध्ये पाणी शिरले आणि आम्ही अडकलो. आम्ही बोगद्यामध्ये ३०० मीटर आत अडकलो होते. तिथेच लोखंडाच्या सळयांना पकडून आम्ही अनेक तास बसून राहिलो.

समोरचा प्रसंग पाहून एकवेळ आम्हाला वाटलं की आता आम्ही आपल्या कुटुंबाला पुन्हा पाहू शकणार नाही. बोगद्यांमध्ये श्वास घेणे अवघड होत होते. आम्ही एका झरोक्यातून आत येणारी हवा घेत होतो. आमच्यापैकी एका कर्मचाऱ्याकडे फोन होता. त्यावरून आम्ही बाहेर संपर्क साधला. त्यानंतर हळूहळू पाणी कमी होऊ लागले. अखेर बचाव पथकाने आम्हाला वाचवले.

हिमाचलमधील मंडी जिल्ह्यात राहणाऱ्या सतीशने सांगितले की, कंपनीमध्ये काम करत असताना अचानक हिमकडा कोसळल्याने पूर आला. त्यामुळे काही कळण्याच्या आतच आम्ही अडकून पडलो. मात्र बाहेरून काही लोक लवकर बाहेर पडण्यासाठी हाक मारत होते. मात्र आम्ही बाहेर पडू शकलो नाही. अनेक तासांनंतर आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या बचाव पथकाने आम्हाला वाचवले.

जोशीमठ येथे राहणाऱ्या धीरेंद्र पवार यांनी सांगितले की, मी तपोवनमधील एका कंपनीत काम करतो. आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक मोठ्या आवाजानंतर टनेलमध्ये पाणी भरले. आम्ही बाहेर पडण्यापूर्वीच बोगदा पाण्याने भरला होता. अनेक तास अडकून पडल्यानंतर अखेर बचाव पथकांनी आमची सुटका केली.

दरम्यान, उत्तराखंडमधील चमोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विविध ठिकाणी बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत १५ जणांना वाचवण्यात आले असून, १४ मृतदेह हाती लागले आहेत.