आधी करा वृक्षारोपण, मगच मिळेल अ‍ॅडमिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:57 PM2019-07-05T17:57:34+5:302019-07-05T18:00:57+5:30

दिल्ली विद्यापीठातील दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने विद्यार्थ्यांना (डीएसजीएमसी) अनोखी पण चांगली अट घातली आहे.

विद्यपीठात प्रवेश घेण्यापूर्वी दिल्लीच्या पर्यावरणासाठी काहीतरी चांगलं काम करण्याचं विद्यापीठाने बजावलं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना एक नियम बनवून दिला आहे.

विद्यापीठाच्या या नियमांचे पालन केल्यास दरवर्षी 55 हजार नवीन झाडं लावले जातील, असे डीएसजीएमसीचे प्रमुख मनजिंदर सिंह यांनी सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश घेताना महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे झाडे लावल्यासंदर्भातील लेखाजोखा सादर करावा लागणार आहे.

डीएसजीएमसीने विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी 10 झाडे लावण्याची सक्ती केली आहे. प्रवेश घेतानाच, विद्यार्थ्यांना तसे वचनपत्र विद्यापीठाला द्यावे लागणार आहे.

विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे केवळ दिल्लीची हवा शुद्ध होणार नसून तरुणांमध्येही पर्यावरणासंदर्भात जागरुकता निर्माण होईल, असे दिल्ली कमिटीने म्हटले आहे.

कमिटीच्या प्रमुखांच्या या आयडियाला स्विकारुन माता सुंदरी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. हरप्रीत कौर आणि खालसा कॉलेजच्या ऑफिसिएटींग प्राचार्य डॉ. पीएस जस्सल सिंह उपक्रब राबविण्याचे म्हटले आहे.

दिल्लीत सध्या वायूप्रदुषणासोबतच जलप्रदुषण ही गंभीर समस्या बनली आहे. शहरातील नागरिकांनावर याचा वाईट परिमाण होत आहे. त्यामुळे दिल्ली विद्यापीठाच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.