गुड न्यूज! कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी, देशभरात आज "ड्राय रन"; जाणून घ्या नेमकं कसं असणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 10:39 AM2021-01-02T10:39:50+5:302021-01-02T10:55:27+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज कोरोना लसीसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,05,788 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,49,218 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,078 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 224 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. देशात कोरोना लसीकरणाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

2 जानेवारीपासून देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोना लसीचे "ड्राय रन" सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ चार राज्यांतच अशा प्रकारचे ड्राय रन करण्यात आले आहे. यात पंजाब, आसाम, गुजरात आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश होता.

चारही राज्यांतून ड्राय रनचे चांगले रिझल्ट समोर आले होते. यानंतर आता सरकारने संपूर्ण देशातच हे ड्रय रन करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण 116 जिल्ह्यांमध्ये 259 जागांवर आज कोरोना लसीसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ड्राय रनसाठी संपूर्ण तयारी झालेली आहे. यासाठी विविध पथकांची निर्मिती केली गेली असल्याचं म्हटलं आहे. तसेच लसीकरणाची मोहीम ही एखाद्या निवडणुकीच्या तयारीप्रमाणे असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

"जशी आपण निवडणुकांची तयारी करतो त्याच प्रमाणे आपल्या सर्व वैद्यकीय टीमच्या प्रत्येक सदस्याला जबाबदारीनं प्रशिक्षित करण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रीय पातळीवर दोन हजार मास्टर्स ट्रेनर्स असतील. देशातील राज्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये याबाबत प्रशिक्षण दिलं जात आहे."

"ही संपूर्ण प्रक्रिया एका निवडणूक प्रक्रियेप्रमाणेच आहे. जिथे एका बूथवर सर्व टीमना प्रशिक्षण दिलं जातं" असं डॉ. हर्षवर्धन म्हणाले. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची एक यादी तयार करण्यात आली असून ती कोविड प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.

दिल्लीतील तीन ठिकाणी, बिहारच्या तीन शहरांमध्ये, पंजाबच्या पटियालामध्ये, हरियाणाच्या पंचकुलातील तीन आरोग्य केंद्रांवर, जम्मू, श्रीनगर आणि कुलगाम जिल्ह्यातील 9 रुग्णालयात, गुजरातच्या दाहोद, भावनगर, वलसाड आणि आणंद जिल्ह्यांत ड्राय रन होणार आहे.

झारखंड, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळमधील काही ठिकाणी ड्राय रन होणार आहे. महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची या ड्राय रनसाठी निवड केली गेली आहे. पुणे, नागपूर, नंदुरबार व जालना या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनांनुसार, ड्राय रनमध्ये राज्यांना आपली काही शहरं निवडावी लागतील. या शहरांत, लस शहरात पोहोचणे, रुग्णालयापर्यंत जाणे, लोकांना बोलावणे, यानंतर डोस देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे पालन, लसीकरण सुरू असल्याप्रमाणे केले जाईल.

याच बरोबर सरकारने कोरोना लसीसंदर्भात तयार केलेल्या कोविन मोबाईल अ‍ॅपचेही ट्रायल होईल. ड्राय रननरम्यान, ज्या लोकांना लस दिली जाणार असते, त्यांना SMS पाठवला जाईल. यानंतर अधिकाऱ्यांपासून ते आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत लसीकरणावर काम केले जाईल.

कोरोना लसीचे ड्राय रन करताना कोणाला लस दिली जाणार आणि सुरुवातीला कोणाला लस मिळणार नाही. याचा डेटा घेतला जाणार आहे. सरकारकडून cowin अ‍ॅपवरद्वारे माहिती अपलोड केली जाणार आहे.

सरकारने असे म्हटले आहे की जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा पहिल्या टप्प्यात सुमारे 300 दशलक्ष लोकांना लस दिली जाईल. प्रथम ही लस कोणाला दिली जाईल. हे देखील निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रथम एक गंभीर आजार असलेले लोक, आरोग्यसेवेतील कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि 50 वर्षांवरील लोकांचा यात समावेश असणार आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. दररोज आढळून येत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 20 ते 25 हजारांच्या आसपास आहे.

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या वेगाने वाढत आहे. देशाचा रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या पुढे गेला आहे. देश जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी सज्ज असल्याचं पंतप्रधान मोदींनी देखील म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण सापडत आहेत. यापूर्वी यावर बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी घाबरण्याचं कोणतंही कारण सरकार यावर सतर्क असल्याचं म्हटलं होतं. गेल्या वर्षभरात सरकारनं कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींवर काम केलं असल्याचंही आरोग्यमंत्री म्हणाले होते.