सूर्यापेक्षा जास्त तापमान, ८४ किमी प्रति सेकंद वेग, आकाशातून कोसळणाऱ्या विजेपासून असा करा स्वत:चा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 09:50 AM2020-06-27T09:50:23+5:302020-06-27T10:09:34+5:30

आपल्या देशात दरवर्षी वीज कोसळून हजारो लोक मृत्युमुखी पडतात, तसेच अनेक जण जायबंदी होतात. त्यामुळे वीज कशी कोसळते आणि त्यामुळे लोकांचा जीव का जातो, हे जाणून घेते महत्त्वाचे आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये वीज कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वीज कोसळून एकाच दिवशी एवढे मृत्यू होण्याची ही गेल्या काही काळातील पहिलीच वेळ आहे. आपल्या देशात दरवर्षी वीज कोसळून हजारो लोक मृत्युमुखी पडतात, तसेच अनेक जण जायबंदी होतात. त्यामुळे वीज कशी कोसळते आणि त्यामुळे लोकांचा जीव का जातो, हे जाणून घेते महत्त्वाचे आहे.

वीज कोसळणे ही एक नैसर्गिक घटना आहे. संपूर्ण जगात वीज कोसळण्याच्या घटनांचा विचार केल्यास दरदिवशी सरासरी ५० ते १०० वेळा वीज कोसळण्याच्या घटना घडतात.

आकाशात कोसळणाऱ्या या विजेचे तापमान अनेकवेळा सूर्यापेक्षा अधिक असते. साधारणपणे १७ हजार ते २७ हजार डिग्री सेल्सियस एवढे विजेचे तापमान असते. तर सूर्याचे सरासरी तापमान हे ५५०५ डिग्री सेल्सियस ते १० हजार डिग्री सेल्सियस एवढे असते.

आकाशातून जमिनीवर कोसळणाऱ्या विजेची गतीही प्रचंड असते. तीन लाख किमी प्रतितास म्हणजेच सुमारे ८४ किमी प्रति सेकंद वेगाने वीज जमिनीवर कोसळते.

आकाशातून कोसळणारी वीज ही इलेक्टिकल डिस्चार्ज असते. ढगामधील हलके असणारे कण कमी वजनामुळे वर जातात आणि पॉझिटिव्ह चार्ज होतात. तर वजनदार कण खालच्या भागात गोळा होतात. ते निगेटिव्ह चार्ज असतात. जेव्हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज अधिक होतो. तेव्हा इलेक्टिक डिस्चार्ज होते.

बऱ्याच वेळा हा इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ढगातच संपून जातो. मात्र अनेकदा त्यातून जमिनीवर वीज कोसळते. आकाशातून कोसळणाऱ्या या विजेमध्ये अब्जावधी व्होल्टची ऊर्जा असते. तसेच विजेमध्ये अधिकाधिक उष्णता असल्याने मोठा आवाज होतो.

जेव्हा अशी वीज तयार होते. तेव्हा जमिनीवर असलेल्या वस्तूंचा इलेक्ट्रिक चार्ज बदलतो. तसेच जमिनीचा वरचा भाग पॉझिटिव्ह चार्ज होतो, तर खालचा भाग निगेटिव्ह चार्ज होतो. उंच इमारती, टॉवर जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज होतात. तेव्हा हा चार्ज ढग खेचून घेतात. तेव्हाच वीज येते. त्यामुळे उंच इमारतींवर बऱ्याचदा वीज कोसळताना दिसते.

वीज कोसळल्याने अनेकदा खाली असलेल्या लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे कोसळणाऱ्या विजेपासून बचाव करण्यासाठी काही खबरदारी घेणे आवश्यक असते. ढगाळ वातावरणात जर तुमच्या डोक्यावरील केस ताठ झाले तर लगेच खाली बसा आणि कान बंद करून घ्या. हे तुमच्या आजूबाजूला वीज कोसळण्याचे संकेत आहेत. अशा वेळी जिथे असाल तिथेत थांबा तसेच पायाखाली सुके लाकूड, प्लॅस्टिक किंवा सुकी पाने घेण्याचा प्रयत्न करा.

वीज कोसळण्याचे संकेत मिळाल्यावर दोन्ही पाय एकमेकांशी जोडून घ्या. दोन्ही हात गुडघ्यांपर्यंत आणा तसेच डोके जमिनीच्या दिशेने शक्य तितके खाली न्या. मात्र डोके जमिनील चिकटू देऊ नका. विजांचा कडकडाट होत असताना तार असलेल्या टेलिफोनचा वापर करू नका. खिडक्या, दरवाजे यापासून दूर राहा.

वीज ही मुख्यत्वेकरून झाडांवर पडते. त्यामुळे झाडाखाली उभे राहू नका. तसेच घोळक्याने उभे राहू नका. घराबाहेर असताना धातूपासून बनलेल्या वस्तूंचा वापर करू नका. दुचाकी, विजेचे खांब किंवा यंत्रांपासून दूर राहा.