CoronaVirus Live Updates : अलर्ट! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची 'ही' आहेत 4 लक्षणं; दीर्घकाळ राहू शकतात सोबत, असा करा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 02:56 PM2021-08-03T14:56:23+5:302021-08-03T15:13:01+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. याची लक्षणं जाणवत असल्याच वेळीच सावध होण्याची गरज आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच अनेक राज्यांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

देशातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल तीन कोटीवर गेला आहे. तर कोरोना बळींची संख्या चार लाख झाली आहे. रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत होती. मात्र आता थो़डा दिलासा मिळाला आहे.

सहा दिवसांनंतर कोरोनाच्या नव्या रुग्ण संख्येत घट झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 30 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 422 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (3 ऑगस्ट) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30,549 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 422 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील रुग्णांची संख्या 3,17,26,507 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,25,195 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,04,958 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,08,96,354 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

लसीकरण मोहीम सुरू असून कोट्य़वधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. कोरोनावर मात करून अनेक जण घरी परतले आहेत. मात्र तरी देखील त्यांना आरोग्य विषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

डेल्टा व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळत आहे. याची लक्षणं जाणवत असल्याच वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण ती दीर्घकाळ सोबत राहू शकतात. त्यामुळे ही लक्षणं कोणती आणि कशी काळजी घ्यायची हे जाणून घेऊया.

कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांना सर्वप्रथम खूप थकवा जाणवतो. कोरोनावर मात केल्यानंतर देखील अनेकांना हा त्रास होत राहतो. त्यामुळे बरे होण्यासाठी जास्त वेळ लागतो. थकवा दूर करण्यासाठी भरपूर आराम करा.

श्वास घेण्यास त्रास होतो. डेल्टाची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये हे लक्षण प्रकर्षाने आढळून येतं. तसेच काही रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये फायब्रॉसिसची समस्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे फुफ्फुसांसंबंधित आजार असलेल्यांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे.

कोरोनातून ठीक झाल्यानंतर देखील अनेकांनी अंगदुखीची तक्रार केली आहे. काही रुग्णांनी शरीरात वेदना होत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे अशा वेळी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांचा सल्ला न घेता, आपल्या मर्जीने कोणतीही औषधं घेऊ नका. उत्तम आहार घ्या. आराम करा आणि वारंवार आपल्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांना द्या. कोरोनाच्या संकटात डॉक्टरांनी हा मोलाचा सल्ला दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाची दुसरी लाट महिलांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. दुसऱ्या लाटेत पुरुषांपेक्षा जास्त महिलांना संसर्ग झाल्याची माहिती आता समोर आली आहे. आरोग्य विभागाच्या मते, दुसऱ्या लाटेत एकूण संक्रमित रुग्णांमध्ये 52.5 टक्के महिला आहेत.

जानेवारी ते जुलै पर्यंत 52.5 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे. एकूण संक्रमित लोकांपैकी 58.8 टक्के पुरुष आहेत. म्हणजेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एकूण संक्रमित रुग्णांपैकी 58 टक्के पुरुष तर 52 टक्के महिलांना संसर्ग झाला आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्त्रियांमध्ये संसर्ग वाढण्याचे महत्त्वाचं कारण म्हणजे व्हायरसचं म्युटेशन हे आहे. त्याच्या स्वरुपात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे महिलांव्यतिरिक्त तरुण देखील मोठ्या प्रमाणात व्हायरसला बळी पडत आहेत.

महिलांमध्ये ऑक्सिजनचा अभाव हे देखील कोरोना संसर्गाचे मुख्य कारण होते. गर्भवती महिलांच्या बाबतीत हे प्रमाण जास्त आहे. प्रसूतीपूर्वी किंवा नंतर ऑक्सिजनचा अभाव. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तिसरी लाट नक्कीच येईल, त्यामुळे तिसऱ्या कोरोना लाटेतही मुले आणि महिलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे.