CoronaVirus News: धोक्याचा इशारा! मेमध्ये कोरोना हाहाकार माजवणार; दिवसाला ८ ते १० लाख रुग्ण सापडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 05:12 PM2021-04-28T17:12:24+5:302021-04-28T17:15:55+5:30

CoronaVirus News: मे महिन्याच्या मध्यावर कोरोनाची दुसरी लाट टोक गाठणार

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाचे ३ लाखाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यातच काल दिवसभरात तब्बल ३ हजारांहून अधिक जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता २ लाखांच्या पुढे गेला आहे. फेब्रुवारीमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय कमी होता. त्यामुळे अनेकजण बेफिकिर राहिले. त्यामुळे मार्चपासून कोरोनाचा स्फोट होऊ लागला.

कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं देशातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. मात्र मे महिन्यात परिस्थिती आणखी भीषण होईल, असा धोक्याचा इशारा मिशिगन विद्यापीठाच्या संसर्गरोग तज्ज्ञ भ्रामर मुखर्जींनी दिला आहे.

मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट टोक गाठेल. मेच्या मध्यात देशात दररोज कोरोनाचे ८ ते १० लाख रुग्ण आढळून येतील. तर दिवसाला सरासरी ४५०० जणांचा कोरोना रुग्णांचा मृत्यू होईल, असा अंदाज मुखर्जी यांनी वर्तवला.

भारतात आलेल्या कोरोना लाटेसाठी अनेक घटक जबाबदार आहेत. पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करणं बंद केलं. मोठ्या प्रचारसभा, धार्मिक कार्यक्रम, क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, असं मुखर्जी म्हणाल्या.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या घटू लागताच प्रशासकीय पातळीपासून सगळ्याच स्तरांवर ढिलाई दिसून आली. या कालावधीत कोरोना लसीकरणाचा वेग वाढायला हवा होता. पण तसं झालं नाही, असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये कोरोनामुळे परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र दिसू लागलं आहे. मात्र इथल्या आकडेवारीबद्दल मुखर्जींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. खरे आकडे दाबून, खोटे आकडे दाखवून काहीही होणार नाही. उलट यामुळे रणनीती तयार करण्यात अडथळे येतील, असा धोका त्यांनी बोलून दाखवला.

रुग्णांचे, मृतांचे खरे आकडे पुढे आल्यास त्यानुसार ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू बेडची व्यवस्था उभारता येते. त्यामुळे संकटाचा सामना उत्तमपणे करता येतो. खोटे आकडे दाखवल्याचा परिणाम वैद्यकीय सुविधांच्या सुसज्जेतवर होतो, असं मुखर्जींनी सांगितलं.

उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, दिल्लीमधील स्थिती गंभीर आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो.

केरळमधील परिस्थिती पुन्हा बिघडू लागली आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, केरळमध्ये लॉकडाऊनची गरज असल्याचं मत मुखर्जींनी व्यक्त केलं.