CoronaVirus News : मोठा दिलासा! ब्रिटनकडून भारतात येणार 'ऑक्सिजन फॅक्टरी'; एक मिनिटात तयार होणार 500 लीटर ऑक्‍सिजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 07:56 PM2021-05-01T19:56:38+5:302021-05-01T20:05:15+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान भारताला जगातील इतर देशांनी मदतीचा हात दिला आहे.

कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,91,64,969 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,11,853 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 4,01,993 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3523 जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मात्र रुग्णांची वाढती संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे.

काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत. ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. याच दरम्यान भारताला जगातील इतर देशांनी मदतीचा हात दिला आहे. ब्रिटनकडूनही भारताला वैद्यकीय उपकरणे, सामग्री पाठवण्यात येत आहे.

ब्रिटनकडून भारताला ऑक्सिजन फॅक्टरी पाठवण्यात येणार आहे. यामुळे प्रति मिनिटाला मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन तयार करता येणे शक्य होणार आहे. उत्तर आयर्लंडमधून हे तीन 'ऑक्सिजन उत्पादक' पाठवण्यात येणार आहे.

प्रति मिनिटाला 500 लीटर ऑक्सिजन निर्माण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी 50 जणांना ऑक्सिजन देता येणे शक्य होणार आहे. एका शिपिंग कंटेनरच्या आकारातील छोटे ऑक्सिजन कारखाने भारतातील रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मागणीला काही प्रमाणात पूर्ण करू शकतील.

कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असून उपाययोजना केल्या जात आहेत.

ब्रिटनचे आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात काय परिस्थिती निर्माण झाली आहे, याचे दृष्य आम्ही पाहिले आहे. कोणीही ती परिस्थिती पाहिली तर त्यांना दु:खच होईल.

कोरोनासारखं महाभयंकर संकट अजूनही संपलेलं नाही. हेच संकेत मिळत आहेत. त्यामुळे सर्वांना सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनकडून भारताला 495 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्स, 120 नॉन-इनव्हेजिव व्हेंटिलेटर आणि 20 मॅन्यूअल व्हेंटिलेटर पाठवण्यात आले आहेत.

मंगळवारी सकाळी ब्रिटनहून 100 व्हेंटिलेटर आणि 95 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर्सची पहिली खेप दाखल झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्येने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असताना केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी शक्कल लढवण्यात आली असून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. कोट्टायम जिल्हा प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन पार्लर्स उघडणार आहेत.

मानरकद येथील सेंट मेरी चर्च ऑडिटोरियममधल्या कोविड केअर सेंटरमध्ये अशा एका ऑक्सिजन पार्लरचं (Oxygen Parlour) उद्घाटन करण्यात आलं आहे. हा केरळमधील पहिलाच उपक्रम आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. ते रुग्ण रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी (Blood Oxygen Level) तपासू शकतात आणि त्यांना गरज असेल तर ऑक्सिजन पार्लरमधून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

घरीच उपचार घेत असलेले रुग्ण प्रोटोकॉल पाळून ऑक्सिजन पार्लरमध्ये येऊन ऑक्सिजन पातळी तपासून गरज असल्यास ऑक्सिजन मिळवू शकतात. पार्लरमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन (Oxygen Concentrator) आहे. जे प्रति मिनिटाला पाच लीटर इतका ऑक्सिजन पुरवू शकतं.

ऑक्सिजन पार्लरमध्ये आलेल्या रुग्णांनी दोन मिनिटं विश्रांती घेतल्यावर पल्स ऑक्सिमीटरच्या (Pulse Oxymeter) सहाय्याने त्यांच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी मोजली जाते. ती 94 टक्क्यांपेक्षा कमी असेल, तरच रुग्णांना या मशीनचा वापर करू दिला जातो.