CoronaVirus News : कोरोना रुग्णांवर आता 'हे' औषध वापरणार, आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 10:17 PM2020-06-27T22:17:34+5:302020-06-27T23:27:01+5:30

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 18,552 रुग्ण सापडल्याने देशभरातील आकडेवारीने तब्बल 5 लाखांचा टप्पा पार केला आहे.

त्यामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या कोरोना रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ (Dexamethasone) हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला (Methylprednisolone) पर्याय म्हणून डेक्सामेथासोन स्‍टीरॉयड (Dexamethasone steroid) औषध वापरायला परवानगी दिली आहे.

कोरोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हे औषध वापरले जाणार आहे. यासाठी सुधारित क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल जारी करण्यात आल्याचे मंत्रालयाने ट्विट केले आहे.

डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध कोरोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे.

डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. कोरोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे असा सल्लाही WHO ने दिला होता.

WHO ने डेक्सामेथासोनचे उत्पादन वेगाने वाढविण्यास सांगितले आहे. खरंतर, ब्रिटनमध्ये केलेल्या संशोधनात डेक्सामेथासोन औषध कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या रुग्णसंख्येत विक्रमी वाढ पाहायला मिळालेली असताना 384 मृत्यूही नोंदविले गेले आहेत. देशात सध्या 1,97,387 रुग्ण उपचार घेत आहेत. तर कोरोनाग्रस्तांचा आकडा 5,08,953 वर गेला आहे. तर 295881 रुग्ण बरे झाले आहेत. देशात एकूण मृतांचा आकडा 15,685 झाला आहे.

पाच लाखांचा टप्पा ओलांडण्यासाठी भारताला 149 दिवस लागले आहेत. अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कोरोनाचा वेग कमी आहे. अमेरिकेमध्ये सर्वात वेगाने प्रसार झाला होता. केवळ 82 दिवसांत अमेरिकेमध्ये पाच लाखांचा टप्पा ओलांडला होता.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 99 लाखांवर गेली आहे.

जगभरात आतापर्यंत 4 लाख 96 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत.