coronavirus: आमदार नवरदेवाच्या लग्नात शेकडो वऱ्हाडी जमले; मास्क, सोशल डिस्टंसिंगचे तीन तेरा वाजले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 06:56 PM2021-04-26T18:56:20+5:302021-04-26T19:06:24+5:30

coronavirus News : एकीकडे देशात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे काही उच्चभ्रू लोक मात्र थाटामाटात सोहळे साजरे करत आहेत. एका आमदाराच्या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमावलीचे तीन तेरा वाजवत मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

एकीकडे देशात कोरोना विषाणूच्या फैलावामुळे संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. मात्र दुसरीकडे काही उच्चभ्रू लोक मात्र थाटामाटात सोहळे साजरे करत आहेत. राजस्थानमधील डुंगरपूर येथूनही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका आमदाराच्या विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमावलीचे तीन तेरा वाजवत मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

डुंगरपूर जिल्ह्यात भारतीय ट्राइबल पक्षाचे आमदार राजकुमार रोत यांचे वऱ्हाड शहराजवळील मगरी गावात गेले होते. आमदार महोदयांच्या विवाह सोहळ्यामध्ये शेकडो वऱ्हाडी जमले होते. मोठा विवाह सोहळा आणि गर्दी असूनही कोरोना नियमावलीचे पालन करवून घेण्यासाठी इथे कुणीही प्रशासकीय व्यक्ती उपस्थित नव्हती.

आमदार राजकुमार रोत यांचे वऱ्हाड रविवारी सकाळी पाडली सांसरपूर गावामधून दोन गाड्यांमधून रवाना झाले. हे वऱ्हाड डुंगरपूर शहराजवळील कुशालमगरी गावात पोहोचले. इंडस्ट्रियल एरिया मोडवर वरात उतरली आणि तिथे आमदार नवरदेव घोडीवर बसले.

येथे दोन घोड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामध्ये एकावर आमदार महोदय बसले होते. दुसरी घोडी मागून चालत होती. पुढे-मागे शेकडो वऱ्हाडी मंडळी चालत होती. आमदार महोदयांच्या विवाहात आदिवासी परंपरेप्रमाणे ढोल नगारे वाजत होते. वऱ्हाडी मंडळींची मोठी गर्दी असल्याने सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नव्हते. तसेच बहुतांश लोकांनी मास्कही लावला नव्हता.

वरात वधूच्या घराजवळ पोहोचल्यावर वधूच्या कुटुंबीयांनी रीतीरिवाजानुसार स्वागत केले. त्यानंतर फुलांचा वर्षाव करून वरासोबत वऱ्हाडी मंडळीला एका घरात उतरवण्यात आले.

मात्र आमदार महोदय या वऱ्हाडी मंडळींना नियमांचे पालन करण्यास सांगताना दिसत होते. कुटुंबातील अनेक लोक कोरोनाच्या नियमांमुळे विवाह सोहळ्याला आले नाहीत. तर प्रत्येक कुटंबामधून केवळ दोन जण आले, असेही आमदारांनी सांगितले. तसेच विवाह करणाऱ्या इतर लोकांनीही नियमांचे पालन करावे, असे सांगितले.