CoronaVirus News: रात्री 8 वाजता बोलणार, म्हणजे मोदींचा मूड काही वेगळाच!; नेहमी याच वेळेवर केल्यात मोठ-मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:07 PM2020-05-12T16:07:14+5:302020-05-12T17:02:03+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 वाजता देशाला संबोधित करणार. एवढी एकच ओळ देशातील नागरिकांचे कान टवकारण्यासाठी पुरेशी आहे. 2016पासून आतापर्यंत आश्चर्य चकित करणाऱ्या जास्तीतजास्त निर्णयांची घोषणा त्यांनी याच वेळेवर केली आहे.

नोटाबंदी असो अथवा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेली लॉकडाउनची घोषणा, अशा अनेक निर्णयांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री आठ वाजता येऊनच दिली आहे. तर, जाणून घेऊया, आतापर्यंत मोदींनी रात्री 8 वाजता केव्हा केव्हा संबोधित केले आणि काय काय मोठ्या घोषणा केल्या.

मोदी नेमके 8 वाजताच का येतात - असे नाही, की पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ 8 वाजताच देशातील नागरिकांना संबोधित करतात. खरे तर हा प्राइम टाइम असतो. संपूर्ण कुटुंब साधारणपणे सोबतच बसलेले असते. त्यामुळे ही एक खास वेळ आहे. कदाचीत यामुळेच त्यांनी ही वेळ निश्चित केली असेल. मागचा इतिहास पाहिला, तर मोदी यावेळेवर जेव्हा-जेव्हा बोलतात, तेव्हा-तेव्हा काही तरी मोठा निर्णय असतो.

नोटाबंदीची माहिती - 8 नोव्हेंबर, 2016, तेव्हा सर्वांचे लक्ष अमेरिकेत होत असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे होते. पंतप्रधान पहिल्यांदाच अचानकपणे देशातील जनतेच्या समोर आले. एवढेच नाही, तर त्यांनी सर्वांनाच घाम फोडणारी घोषणाही केली. यावेळी त्यांनी सांगितले, की 'आजपासून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात येत आहेत.'

'मिशन शक्ती'ची माहिती - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2019 मध्ये देशाला संबोधित करताना भारताच्या 'मिशन शक्ती' प्रॉजेक्टची माहिती दिली होती. हा प्रोजेक्ट यश्वी झाला असून, यात अंतराळात असलेले एक सॅटेलाइट 3 मिनिटांतच उद्धवस्त करण्यात आल्याचे मोदींनी जाहीर केले होते.

ऑगस्ट 2019 मध्ये पुन्हा एकदा 8 वाजता - वर्ष 2019, ऑगस्ट महिना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा 8 वाजताच देशाला संबोधित केले. यावेळीही लोकांच्या मनात धडकी भरली होती. त्यांना वाटत होते, आता पुन्हा नोटाबंदी सारखीच काही तरी घोषणा आहे. मात्र, यावेळी तसे काहीही झाले नाही. तेव्हा मोदी समोर आले आणि त्यांनी केवळ जम्मू काश्मीरवर बोलायला सुरुवात केली. तेव्हा सरकारने तेथील आर्टिकल 370 हटवले होते.

19 मार्च, 2020 - पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मार्च 2020च्या रात्री 8 वाजता पुन्हा समोर आले. त्यांनी कोरोना व्हायरससंदर्भात देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी जनतेला सहकार्याचे आवाहन करत रविवारी 22 मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली. त्यावेळी सायंकाळी पाच वाजता, पाच मिनिटांसाठी टाळ्या वाजवत वैद्यकीय सेवा आदी पुरवणाऱ्या लोकांचे आभार मानायला सांगितले.

21 दिवसांचा लॉकडाउन - मोदी 24 मार्चला पुन्हा एकदा देशातील जनतेच्या समोर आले. यावेळी त्यांनी, कोरोनाचा सामना करण्यासाठी देशाला किमान 21 दिवसांची आवश्यकता आहे, असे सांगितले. यावेळीही 8 वाजताच केलेल्या संबोधनात त्यांनी 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. याचा काळ 13 एप्रिलपर्यंत होता.

3 मेपर्यंत वाढवला लॉकडाउन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलला पुन्हा एकदा देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी कोरोनाविरोधातील लढाईत लॉकडाउन 3 मेपर्यंत वाढवत असल्याची घोषणा केली होती.

तीन मेनंतर देशातील लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. यावेळी तो 17 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक कामे जवळपास ठप्पच आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यात काही उद्योगांना सुरुवात करण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. भारत ही आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी देशातल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी तब्बल सहा तास चर्चा केली होती. त्यात काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली होती.