CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात थोडा दिलासा पण "या" राज्यांनी वाढवली चिंता

By सायली शिर्के | Published: October 13, 2020 09:45 AM2020-10-13T09:45:43+5:302020-10-13T10:07:50+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे.

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत थोडी घट होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 71 लाखांचा टप्पा पार केला आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 71,75,881 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 55,342 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 706 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. रिकव्हरी रेट वाढताना दिसत आहे.

देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अनेकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई यशस्वीरित्या जिंकली आहे. तसेच देशातील मृत्यूदर देखील कमी झालेला आहे.

सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने उच्चांक गाठल्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यात मात्र सलग दिलासा देणारी आकडेवारी समोर येत आहे.

कोरोना संसर्ग झालेल्यांच्या संख्येत घट होताना पाहायला मिळत आहे. 1 ऑक्टोबरनंतर देशातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या 80 हजारांच्या पुढे गेलेली नाही. येत्या काळातही हेच चित्र राहिल्यास लवकरच कोरोना रुग्णांची संख्या घटत जाईल.

कोरोना चाचण्यांची संख्या 8 कोटी 78 लाखांवर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार 11 ऑक्टोबर रोजी 9,94,851 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता 8,72,093 झाली आहे.

देशामध्ये दररोजच्या रुग्णवाढीचा आकडा उतरणीला लागला असून, गेल्या सलग नऊ दिवसांपासून कोरोना बळींची संख्याही एक हजारहून कमी आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र असं असताना महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या संख्येत थोडासा दिलासा मिळाला असला तरी देशातील चार राज्यांनी चिंतेत भर टाकली आहे. या राज्यात कोरोनाचा वेग वाढला असून रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,09,856 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

केरळमधील तीन जिल्ह्यांमध्ये या महिन्याच्या सुरुवातीच्या अकरा दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये जवळपास 60 टक्के वाढ झाली आहे. कोझीकोडमध्ये 62.2%, त्रिसूरमध्ये 61.9%, कोल्लम मध्ये 57.9% केसेस वाढल्या आहेत.

कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये 37.2%, कोडागू 32.2% आणि तुमाकुरू 28.7% तर पश्चिम बंगालच्या झारग्राममध्ये 38.%, वीरभूम 20.3% आणि नादिया जिल्ह्यामध्ये 19.5% कोरोना केसेस या महिन्यात वाढल्या आहेत.

देशभरात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. मात्र रुग्णांच्या आकडेवारीनुसार काही राज्यांमध्ये ते आणखी वाढवण्याची गरज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगामध्ये कोरोनाचे 3 कोटी 77 लाखांहून अधिक रुग्ण आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेमध्ये 79 लाख 92 हजार रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा 8 लाखांनी कमी आहे.

दोन्ही देशांतील रुग्णसंख्येतील तफावत दिवसेंदिवस कमी होत असून, अमेरिकेवर काही दिवसांत मात करून भारत सर्वाधिक कोरोना रुग्णांचा देश होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 50 लाख 94 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत.