CoronaVirus : रशियन लसीनंतर आता भारत करणार 'हा' मोठा प्रयोग, AIIMSच्या संचालकांनी सांगितलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 11:15 PM2020-08-11T23:15:21+5:302020-08-11T23:39:07+5:30

रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी घोषणा केली, की त्यांनी कोरोनावरील पहिली लस तयार केली आहे. एवढेच नाही, तर ही जगातील पहिली यशस्वी लस असल्याचा दावाही पुतिन यांनी केला आहे. या लसीला रशियन आरोग्य मंत्रालयानेही मंजुरी दिली आहे.

रशियाने लस तयार केल्याच्या दाव्यावर दिल्ली येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनीही भाष्य केले. तसेच आता भारत कोणता नवा प्रयोग करणार आहे, हेही त्यांनी सांगितले.

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, एका यशस्वी लसीचा डोस सुरक्षित असायला हवा. हे पहिले मानक आहे. सॅम्पलचा आकार काय आहे? तसेच त्याचा किती प्रभाव होतो? हेदेखील स्पष्ट करण्याची आवश्यकता असते. डोस सुरक्षित असायला हवा.

गुलेरिया म्हणाले, आता एम्स जे लोक कोरोनातून रिकव्हर झाले आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोस्ट-कोविड रिकव्हरी क्लिनिक सुरू करण्यात येईल. जेनेकरून, त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता सुधारण्यावर लक्ष देता येईल. मग त्यात व्यायाम, योग, आहार तसेच औषधाचाही समावेश असेल.

ज्या रुग्णांना रिकव्हरीबरोबरच फुफ्फुसाची समस्या जाणवत आहे. त्यांच्यावरही लक्ष दिले जाईल. काही रुग्णांना पोस्ट-कोविडचे अनेक सीक्वल दिसत आहेत. रिकव्हरीनंतरही अनेक रुग्णांना त्रास होत आहे. त्यांना श्वास घ्यायलाही त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.

गुलेरिया म्हणाले, पोस्ट-कोविड रिकव्हरी क्लिनिकसाठी इस्रायल भारताची मदत करणार आहे. रोबोट रुग्णांवर लक्ष ठेवायला मदत करतील.

गुलेरिया यांनी सांगितले, की हे उपकरण दूरवरच्या भागांतही फुफ्फूस, हृदय आणि श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांसाठीही वापरले जाऊ शकते आणि त्यांचा जीव वाचवला जाऊ शकतो. या उपकारणांचा अगदी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते शहरांतील मोठ्या रुग्णालयांतही वापर केला जाऊ शकतो.

भारतातील कोरोनाच्या स्थितीवर बोलताना गुलेरिया म्हणाले, सध्या भारतातील काही राज्यांत कोरोनाची जी स्थिती आहे, येणाऱ्या काळात ती आणखी बिघडू शकते. देशात पुढील काही आठवड्यांत पीक स्थिती असू शकते. एवढेच नाही, तर लोकांनी सर्व दिशा निर्देशांचे पालन करायला हवे, असेही ते म्हणाले.

भारतातील लसीच्या विकासासंदर्भात ते म्हणाले, भारतातील लसी दुसऱ्या-तिसऱ्या परीक्षणाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. आपल्याकडे लसीच्या उत्पादनाची मोठी क्षमता आहे. भारत लसीवर सुरुवातीपासूनच काम करत आहे.

आज संपूर्ण जग कोरोना महामारीचा सामना करत आहे. अशात रशियाने एक आशा जागवली आहे. रशियाने कोरोनाची पहिली लस तयार केल्याची घोषणा पुतीन यांनी केली. तसेच लवकरच या लसीचे उत्पादनही सुरू केले जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर लसीचे डोस तयार केले जाणार असल्याचेही रशियाने म्हटले आहे.