Coronavirus In Maharashtra: देशात दिवसभरात ८ हजार ३०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील स्थिती काय?, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 12:45 PM2021-12-06T12:45:49+5:302021-12-06T13:05:10+5:30

गेल्या २४ तासांत देशभरात ८ हजार ३०६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे सध्या देशात ९८ हजार ४१६ जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.

दिवसभरात देशात ८ हजार ८३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच २११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.

जगभरातील ३८ देशामध्ये पसरलेला कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट आता भारतातही वेगाने फैलावत आहे. केवळ चार दिवसांमध्ये देशातील ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. २ डिसेंबर रोजी देशात ओमायक्रॉनची बाधा झालेला पहिला रुग्ण सापडला होता. तेव्हापासून ६ डिसेंबरपर्यंत या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २१ पर्यंत पोहोचली आहे.

कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात ७ बाधित आढळल्याने खळबळ उडाली. आळंदीत एका तरुणाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असून, त्याचे नेमके निदान झालेले नाही. ओमायक्रॉनबाधितांची राज्यात एकूण संख्या ८ झाली आहे. राजस्थानातील जयपूर येथे नऊ तर राजधानी दिल्लीत एक असे दहा ओमायक्रॉनबाधित रविवारी आढळले. ओमायक्राॅनबाधितांची देशातील संख्या आता २१ झाली आहे.

राज्यात डाेंबिवलीत ओमायक्रॉनचा पहिला बाधित आढळला. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ७ जणांना ओमायक्रॉनची बाधा झाली. भारतीय वंशाची महिला २४ नोव्हेंबरला नायजेरियातून पिंपरी-चिंचवड शहरात आली होती. सोबत तिच्या दोन मुलीही होत्या. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली असता महिलेचा भाऊ, दोन मुली अशा सहा जणांनाही लागण झाल्याचे उघड झाले. पुण्यातील ओमायक्राॅन बाधित फिनलँड येथून परतला हाेता.