CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावणं किती गरजेचं?; WHO ने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:11 PM2022-01-19T12:11:41+5:302022-01-19T12:28:59+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे.

कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 32 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दुसरीकडे ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील दिवसागणिक वाढ होत आहे. एकूण आकडा 8,961 वर पोहोचली आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत.

कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

बुधवारी (19 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,82,970 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लाखो रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉनचा देशातील अनेक ऱाज्यांमध्ये संसर्ग झाला आहे.

काही राज्यांनी वाढता धोका लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू केले आहेत. तर काही ठिकाणी नाईट कर्फ्यू आहे. रुग्णसंख्येत वाढ झाली असली तरी सरकारने लॉकडाउन लावण्यासंदर्भात कोणताच निर्णय घेतलेला नाही. पण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

भारतात कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लावायला हवा की नाही, यावर जागतिक आरोग्य संघटनेने आता भाष्य केलं आहे. भारतात सध्या पूर्ण लॉकडाऊनची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

डब्ल्यूएचओचे भारतातील प्रतिनिधी, रॉड्रिको एच. ऑफ्रिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतासारख्या देशात, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लादणे आणि प्रवासावर बंदी घालणे यासारखी पावलं नुकसान पोहोचवू शकतात.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जीवन आणि रोजगार दोन्ही वाचवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं. कोरोना व्हायरसच्या साथीचा सामना करण्यासाठी, जोखमीनुसार बंदी घालण्याचे धोरण आखले पाहिजे.

WHO प्रवास बंदीची शिफारस करत नाही किंवा लोकांच्या हालचालींवर पूर्ण बंदी घालण्याचा आग्रह धरत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. भारत आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्य कृती ठरवण्यासाठी चार प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे.

पहिला- कोरोनाचा नवीन प्रकार किती संसर्गजन्य आहे. दुसरा- नवीन प्रकारामुळे होणारा रोग किती गंभीर आहे. तिसरा- लस आणि पूर्वीचे कोरोना संसर्गाला माणसाला किती संरक्षण देतात आणि चौथा – सामान्य लोक या धोक्याला कसं पाहतात आणि ते टाळण्यासाठी उपायांचे पालन कशा पद्धतीने करतात.

या चार प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जावा असंही त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच ऑफ्रिन यांनी संपूर्ण लॉकडाऊन लादण्याचा फायदा कमी आणि तोटा जास्त आहे, कारण संसर्ग रोखण्यासाठी लादलेल्या निर्बंधांमुळे खूप आर्थिक नुकसान होतं असं सांगितलं.

भारतासारख्या देशात जेथे खूप विविधता आहे, तेथे साथीच्या रोगाशी लढण्यासाठी जोखीम-आधारित दृष्टिकोन अवलंबणे शहाणपणाचे वाटते असं देखील म्हटलं आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.