CoronaVirus Live Updates : "लोक मरत राहावेत असंच तुम्हाला वाटत असल्याचं दिसतंय", न्यायालयाकडून केंद्राची कानउघाडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 02:01 PM2021-04-29T14:01:09+5:302021-04-29T14:25:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असतानाच बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता जाणवत आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,83,76,524 वर पोहोचला आहे. याच दरम्यान देशातील अनेक रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत असतानाच बेड्स, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरची कमतरता जाणवत आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने कोरोना उपचार प्रोटोकॉलमध्ये बदल केल्याबद्दल आणि उपलब्ध ऑक्सिजनचा पूर्णपणे पुरवठा न करण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. लोकांचा जीव जात राहावा असं सरकारचं धोरण दिसत असल्याची बोचरी टीका न्यायालयाने केली आहे.

कोरोना उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा करण्यासंदर्भातील प्रोटोकॉलनुसार केवळ ऑक्सिजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच हे औषध देण्यात यावे असं म्हटलं आहे. याचसंदर्भात न्यायालयाने आता आपली नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायमूर्ती प्रतिभा एम. सिंह यांनी केंद्र सरकारला हे चुकीचं आहे. नियम बनवताना बुद्धीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही असं वाटतंय. ज्यांच्याकडे ऑक्सिजनची सुविधा नाहीय अशा ठिकाणी रेमडेसिवीर औषध दिलं जाणार नाही असं म्हटलं आहे.

लोकांनी मरत राहावं अशीच तुमची इच्छा आहे, असं यावरुन वाटतं अशा शब्दांत प्रतिभा एम. सिंह यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या रेमडेसिवीर प्रोटोकॉलनुसार ऑक्सिजनवर असणाऱ्यांनाच हे औषध दिलं जात आहे.

उच्च न्यायालयाने "रेमडेसिवीरचा तुटवडा भरुन काढण्यासाठी प्रोटोकॉल बदलण्यात आले नाहीत. हे चुकीचं आहे. यामुळे डॉक्टरांना रुग्णांसाठी रेमडेसिवीर औषध लिहून देता येणार नाही. या साऱ्यामधून नियोजनाचा आभाव दिसून येत आहे" असं म्हटलं आहे.

रेमडेसिवीरच्या पुरवठ्यासंदर्भात केंद्राने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीला देण्यात आलेल्या 72 हजार रेमडेसिवीर औषधांपैकी 52 हजारांचा साठा 27 एप्रिल रोजी पाठवण्यात आला आहे.

न्यायालयाने एका खासदाराने दिल्लीतून रेमडेसिवीरचा 10 हजारांचा साठा नेल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. खासगी विमानाने महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये नेऊन त्याचं वाटप केलं, हे आश्चर्यचकित करणारं आहे असं म्हटलं आहे.

न्यायालायने कोरोनासंदर्भात एका वकिलाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना रेमडेसिवीरसंदर्भात चिंता व्यक्त केली. या वकिलाने दाखल केलेल्या याचिकेनुसार एकूण सहा डोसेसची गरज असताना केवळ तीन डोस मिळाल्याचं म्हटलं होतं. न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर मंगळवारी इतर तीन डोस या वकिलाला मिळाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोना काळात रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे, अनेक ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून अधिकचे पैसे घेऊन तसेच काळाबाजार करून हे इंजेक्शन विकलं जात आहे. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे,. रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा असताना स्वस्त इंजेक्शनवर Remdesivir चं खोटं लेबल लावलं जात असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये तब्बल 700 जणांची फसवणूक करण्यात आली असून अनेकांचा जीव धोक्यात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या अनेकांना शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना आतापर्यंत अटक केली आहे. एका स्वस्त इंजेक्शनवर हे रेमडेसिवीर इंजेक्शनचं खोटं लेबल लावत आणि ते तब्बल 15 ते 20 हजारांना विकत असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक तपासादरम्यान आरोपींनी 98 रुपयांच्या PPT 4.5 GM इंजेक्शनवर रेमडेसिवीरचं लेबल लाऊन 700 पेक्षा जास्त लोकांना ते विकून त्यांची फसवणूक केली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत जवळपास 4800 रुपये इतकी आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा वेळी आरोपी ते इंजेक्शन ज्यांना गरज आहे त्यांना 15 ते 20 हजारांना विकत आहेत. यामध्ये दुसऱ्या इंजेक्शनला लेबल लावून ते हजारो रुपयांना विकून अनेकांचा जीव धोक्यात टाकला जात आहे.

आरोपींकडून इंजेक्शनच्या 59 बाटल्या, PPT 4.5 GM चे 240 पॅकेट इंजेक्शन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचे 4,224 लेबल तसेच 85,840 रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.