CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! "'या' जिल्ह्यांत किमान 6 ते 8 आठवड्यांचा लॉकडाऊन हवा"; ICMR प्रमुखांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:52 AM2021-05-13T11:52:13+5:302021-05-13T12:08:37+5:30

ICMR Balram Bhargava On Covid 19 Situation And Lockdown : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी देशातील लॉकडाऊनसंबंधी महत्त्वाचं आणि मोठं विधान केलं आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,37,03,665 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,58,317 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,62,727 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4,120 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.

कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच आता देशातील काही राज्यांनी प्रशासनाची चिंतेत भर घातली आहे.

रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्याही मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान लॉकडाऊनबाबत देखील मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे,

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava) यांनी देशातील लॉकडाऊनसंबंधी महत्त्वाचं आणि मोठं विधान केलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी लॉकडाऊनबाबत भाष्य केलं आहे.

कोरोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रसार रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाऊन ठेवला पाहिजे असं मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर 10 टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाऊन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

सध्या भारतातील 718 जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसंच बंगळूरूचा समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

भार्गव यांनी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या जास्त असणाऱ्यांना जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावला पाहिजे. पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर आल्यानंतर सर्व काही सुरळीत करt शकतो. पण तसं झालं पाहिजे असं म्हटलं आहे.

मला वाटतं 10 टक्क्यांची शिफारस मान्य कऱण्यास उशीर झाला. 15 एप्रिलला टास्क फोर्सने सरकारला 10 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊन करण्याची शिफारस केली होती असं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा वेग मंदावत असताना काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. नव्या रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुदुच्चेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, आणि अरुणाचल प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.

देशातील 13 राज्यांमध्ये 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 6 राज्यांमध्ये 50 ते 1 लाखांवर सक्रिय रुग्ण आहेत. आणि 17 राज्यांमध्ये 50 हजारांवर सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

18 राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असल्याने देशाचा पॉझिटिव्हिटी दर हा कमी होत असल्याचे संकेत आहेत. हा दर आता 21 टक्क्यांवर आला आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.

27 एप्रिलपासून देशाच्या पॉझिटिव्हिटी दरात घट दिसून येत आहे. देशातील 734 जिल्ह्यांपैकी 310 जिल्ह्यांमध्ये अजूनही पॉझिटिव्हिटी दर हा 42 टक्क्यांवर आहे. पण देशाचा एकूण सरासरी दर हा आता 21 टक्क्यांवर आला आहे, असं भार्गव म्हणाले.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दिल्लीसह देशातील एकूण 18 राज्यांमधील कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. तसंच देशाचा पॉझिटिव्हिटी दर सरासरी 21 टक्के इतका आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदीगड, लडाख, दीव-दमण, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार यांचा या 18 राज्यांमध्ये समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली.