CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'देशात आता येणार नाही कोरोनाची तिसरी लाट पण...'; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 12:06 PM2021-09-22T12:06:36+5:302021-09-22T12:26:48+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 26,964 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 383 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,45,768 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनामुळे काही राज्यात मात्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच कोरोनावर अनेकांना यशस्वीरित्या मात केली असून अनेक जण उपचारानंतर बरे झाले आहेत. याच दरम्यान आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. तज्ज्ञांनी कोरोनाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

देशात आता कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोरोना व्हायरस आता महामारी राहिला नसल्याचं म्हटलं आहे. पण जोपर्यंत देशातील प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण होत नाही तोपर्यंत अत्यंत सावध आणि सतर्क असणं गरजेचं असल्याचं देखील सांगितलं.

रणदीप गुलेरिया यांनी सर्व लोकांना सण-समारंभाच्या काळात गर्दीपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे. नव्या रुग्णांच्या संख्येत थोडी घट होत आहे. कोरोना देशातून पूर्णत: कधीच नष्ट होणार नाही. मात्र देशात वेगाने होणाऱ्या लसीकरणामुळे कोरोनाचा वेग थोडा मंदावताना पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरस हा लवकरच साधा ताप, सर्दी, खोकलासारखा होणार आहे. कारण लोकांमध्ये आता कोरोना विरोधात इम्युनिटी तयार झाली आहे. पण आजारी आणि इम्युनिटी कमी असलेल्या लोकांमध्ये कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका हा असणारच आहे असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे.

देशातील सर्व लोकांना कोरोना लस देणं हे अत्यंत गरजेचं आहे. काही लोकांना बूस्टर डोसची आवश्यकता भासू शकते. पण यावर निर्णय घेतला जाईल. सर्वात आधी सर्वांनी लस घेतली पाहिजे त्यानंतर बूस्टर डोसचा विषय येईल. डिसेंबरपर्यंत सर्वांना लस देण्याचं लक्ष्य असल्याचं डॉक्टर गुलेरिया यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच देशासाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोविड-19 चा आर व्हॅल्यू घटून 1 टक्क्याच्या आत आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तो 1.17 होता. त्यानंतर 15 सप्टेंबरपर्यंत तो घटून 0.92 झाला.

मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये मात्र अजूनही आर व्हॅल्यू एक टक्क्याच्या आसपास आहे. दिल्ली आणि पुण्यामध्ये आर व्हॅल्यू अजूनही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असलेल्या केरळ आणि महाराष्ट्रामधील आर व्हॅल्यूसुद्धा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. ही बाब या दोन्ही राज्यांसाठी दिलासादायक आहे.

ऑगस्टच्या अखेरीस ही आर व्हॅल्यू 1.17 होती. ती 4 ते 7 सप्टेंबरदरम्यान घटून 1.11 झाली. आणि तेव्हापासून ती 1 टक्क्याच्या खाली आहे. गणितीय विज्ञान संस्था, चेन्नईचे सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितले की, दिलासादायक बाब म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असूनही भारताचा रिप्रॉडक्शन नंबर सातत्याने 1 पेक्षा कमी आहे.

भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना 9 मार्च ते 2` एप्रिलपर्यंत देशातील एकूण आर व्हॅल्यू 1.37 होती. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशामधील रिकव्हरी रेट हा 97.75 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशामधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 2.08 आहे. जो गेल्या 88 दिवसांपासून 3 टक्क्यांच्या आत आहे.

WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की, वयस्करांच्या तुलनेत कोरोना व्हायरची लागण मुलांना आणि तरुणांना कमी प्रमाणात होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची मोठ्या प्रमाणावर लागण होत असल्याचेही समोर येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच तरुणांचा मृत्यूदर देखील कमी आहे.

भारतात कोरोना लसीकरणाची मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. देशात कोरोना लसीचे तब्बल 75 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली. तर दुसरीकडे कोरोना लसीकरणासाठी जागतिक आरोग्य संघटनेने भारताचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे.

मनसुख मांडविया यांनी सोमवारी "या वर्षी जानेवारी महिन्यात लसीकरणाची देशव्यापी मोहीम सुरू झाल्यापासून भारतात 75 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले आहेत. जर याच वेगात लसीकरण सुरू राहिले तर डिसेंबरपर्यंत देशातील 43 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण होईल" असं म्हटलं आहे.

"नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास' या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देशाने 75 कोटी डोसचा आकडा पार केला आहे" असं देखील म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताचे अभिनंदन केले आहे आहे. कोरोना लसीकरण वेगात करत असल्यामुळे भरभरून कौतुक केलं आहे.

डब्ल्यूएचओ दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह यांनी "डब्ल्यूएचओने अभूतपूर्व वेगाने कोरोना लसीकरण केल्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. पहिले 100 दशलक्ष डोस वितरीत करण्यासाठी भारताला 85 दिवस लागले. दरम्यान, भारताने फक्त 13 दिवसांत 650 दशलक्ष कोरोना डोसपासून 750 दशलक्ष कोरोना डोस देण्याचा टप्पा पूर्ण केला आहे" असं म्हटलं आहे.