CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात कोरोनाचा धोका वाढला; घरामध्येही मास्क लावण्याचं लोकांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 05:30 PM2021-10-12T17:30:36+5:302021-10-12T17:52:28+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी काही ठिकाणी अद्यापही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या संख्येने तब्बल 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 14,313 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (12 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 14 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3,39,85,920 वर पोहोचली.

देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,14,900 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे 4,50,963 जणांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा वेग जरी मंदावला असला तरी काही ठिकाणी अद्यापही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

मिझोरममध्ये लोकांना घरामध्ये देखील मास्क लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जेवण्यासाठी देखील एकत्र बसू नका असं आवाहन करण्यात आलं आहे. मिझोरम सरकारने लोकांना कोरोना संक्रमणापासून वाचण्यासाठी मास्कचं महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिलं आहे.

लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सोमवारी दहा दिवसांतं मास्क अभियान सुरू करण्यात आलं आहे. यामध्ये लोकांना घरामध्ये देखील मास्क लावण्याचा तसेच सर्वांनी एकत्र बसून न जेवण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्यमंत्री डॉ. आर लालथंगलियाना यांनी राज्यामध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडा देखील वाढल्याचं म्हटलं आहे. सोमवारी 307 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

काही दिवसांपूर्वी भारतामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा आकडा पार केला आहे. असं असताना मोठा दिलासा मिळाला आहे.

देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 224 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. पण असं असलं तरी अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही. तज्ज्ञांनी लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

सणसमारंभामध्ये निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. येत्या 3 महिन्यांत डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहितीही याआधी समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. याच दरम्यान आता केंद्र सरकारकडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. सणसमारंभाच्या काळात पुढील तीन महिने अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवीन गाईडलाईन जारी केल्या आहेत.

डेल्टा व्हेरिएंटचा मोठा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. तज्ज्ञांनी याबाबत लोकांना सतर्क केलं असून काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत गेली तर काही राज्यांमध्ये कोरोनाची तिसरी लाट भयावह रूप धारण करू शकते असं म्हटलं आहे.

संशोधकांनी सुट्टीच्या काळात पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आणि सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कारणांसाठी मोठ्या संख्येने होणाऱ्या संमेलनांमुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढू शकतात. प्रवासावर भर देत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की काही राज्यांमध्ये संभाव्य तिसऱ्या लाटेची परिस्थिती भीषण असू शकते.

तज्ञांनी अलर्ट दिला असून सुट्टीचा कालावधीत संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता 103 टक्क्यांनी वाढवू शकते आणि त्या लाटेत संक्रमणाची प्रकरणे 43 टक्क्यांनी वाढू शकतात. संशोधकांनी 'ओपीनियन पीस' मध्ये हा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. तिसऱ्या लाटेमुळे परिस्थिती बिघडू शकते असं म्हटलं आहे.