coronavirus: गुजरातमध्ये ऑक्सिजनवरून रणकंदन; सिलेंडर भरण्यासाठी मारामारी, गोळीबारही केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 02:57 PM2021-04-28T14:57:11+5:302021-04-28T15:07:41+5:30

Oxygen shortage in india : कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यात देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन मिळवण्यासाठी आता लोकांचा संयम सुटताना दिसत आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप धारण केल्याने देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला आहे. त्यात देशातील अनेक भागात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याने कोरोनाबाधित रुग्णा आणि त्यांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे ऑक्सिजन मिळवण्यासाठी आता लोकांचा संयम सुटताना दिसत आहे. गुजरातमधील कच्छ येथे तर ऑक्सिजन मिळवण्यासाठी लोकांची हाणामारी करण्यापर्यंत मजल गेली. येथे काही लोक ऑक्सिजन सिलेंडर भरून देणाऱ्या कंपनीत घुसले. त्यांनी तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांना धमकावले. तसेच गोळीबारही केला.

मिळत असलेल्या माहितीनुसार कंपनीचे कर्मचारी आणि या लोकांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर भरण्यावरून वाज झाला. त्यानंतर या लोकांना कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली आणि मारहाण केली. या लोकांपैकी एकाने हवेत गोळ्यांच्या तीन फैरी झाडत दहशत माजवली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत चारही जण पसार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. लवकरच या आरोपींना पकडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर ऑक्सिजन सेंटरवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, भचाऊनगरच्या जवळ असलेल्या मोटा चिराई गावात ऑक्सिजन भरण्यासाठीच्या यंत्राच्या मार्गात अडथळा आणाऱ्या एका वाहनावरून काही लोक नाराज झाले. त्यांची तिथे वाट पाहत असलेल्या इतर लोकांसोबत वादावादी झाली. त्यावेळी एका व्यक्तीने पिस्तूल काढून गोळीबार गेला.

देशातील अन्य भागांप्रमाणेच गुजरातमध्येही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. लोकांना उपचारांसाठी बेड मिळणे कठीण झालेल आहे. तसेच ऑक्सिजन मिळवण्यातही अडथळे येत आहेत. त्यामुळे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.