coronavirus: घरी राहून घेताय कोरोनावर उपचार, तरीही मिळू शकतो विम्याचा लाभ, अशी आहे प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:43 PM2021-04-28T12:43:04+5:302021-04-28T12:47:30+5:30

Insurance for covid-19 treatment : भारतामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट गंभीर झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र अशा लोकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

भारतामध्ये कोरोना विषाणूच्या फैलावाचे संकट गंभीर झाले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची टंचाई जाणवत आहे. तर काही ठिकाणी रुग्णांना बेड मिळत नाही आहेत. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना घरीच राहून उपचार घ्यावे लागत आहेत. मात्र अशा लोकांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता कोरोनाबाधित रुग्णांना रुग्णालयात भरती झाले नसले तरी आरोग्य विमा मिळू शकणार आहे. जाणून घेऊयात या विम्याची प्रक्रिया.

सध्या अनेक रुग्णालये कोरोनाबाधित रुग्णांसाठी होमकेअर पॅकेट पुरवत आहेत. अशा पॅकेजवर आरोग्य विम्याचा लाभ मिळू शकतो. आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सचे क्लेम्स अंडररायटींग आणि रीइन्शुरन्सचे प्रमुख संजय दत्ता यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीजवळ होम ट्रिटमेंटची दरमहा सुमारे १ हजारांहून अधिक प्रकरणे येत आहेत.

RenewBuy चे सहसंस्थापक इंद्रनील चटर्जी यांनी सांगितले की, आदेशानुसार सर्व विमा पॉलिसींअंतर्गत याला कव्हर केले जात आहे. काही जुन्या पॉलिसींमध्ये याला कव्हर करण्यात आलेले नसेल. मात्र सर्व नव्या पॉलिसींमध्ये याला कव्हर केले जात आहे. तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या कॉल सेंटरमधून त्यांच्या पॉलिसीमध्ये ही व्यवस्था आहे की नाही याची माहिती मिळवू शकता.

रुग्णालयांच्या अशा होमकेअर पॅकेजमध्ये मेडिकेशन, डॉक्टर किंवा नर्सची होम व्हिजिट, सीटी स्कॅन, एक्सरे आमि कोरोना चाचणी अशा सुविधांचा समावेश आहे. जोपर्यंत रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत त्याचे सर्व मेडिकल खर्च यामध्ये कव्हर केले जातात.

काय आहेत याच्या अटी : अशा प्रकारच्या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही जुन्या अटींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. सर्वप्रथण रुग्णाची कोरोना पॉझिटिव्ह चाचणी ही आयसीएमआरकडून मान्यताप्राप्त लॅबमधून झालेली असली पाहिजे. चाचणी ही आरटी-पीसीआर चाचणी असली पाहिजे. त्यामध्ये स्पेशनमेन रेफरल फॉर्म आयडीसुद्धा असला पाहिजे. दुसरी अट ही आहे की, होम आयसोलेशन आणि उपचारांदरम्यान, रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

कोरोना कवच आणि कोरोना रक्षक पॉलिसी : जर एखाद्या व्यक्तीकडे कोरोनाच्या खास उपचारासाठी आवश्यक असलेली कोरोना कवच किंवा कोरोना रक्षक पॉलिसी असेल तर अजिबात गोंधळून जाण्याची गरज नाही. या दोन्ही पॉलिसींमध्ये होम केअर ट्रिटमेंटचे कव्हर समाविष्ट आहे.