coronavirus: त्यांच्या प्रेमाला लागले कोरोनाचे ग्रहण, संसर्गामुळे पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 02:47 PM2021-04-29T14:47:26+5:302021-04-29T15:20:06+5:30

coronavirus In India : कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या वियोगाने व्याकूळ झालेल्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्याने त्याच्या वियोगाने व्याकूळ झालेल्या पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मध्य प्रदेशमधील इंदूर इंदूर येथील राजेंद्रनगरमधील सेंचुरी पार्कमधील रहिवासी असलेल्या ३४ वर्षीय प्राध्यापक नेहा पवार यांचे पती डेप्युटी रेंजर पवन पवार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांच्या मृत्यूनंतर नेहा पराव यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली.

पाच वर्षांपूर्वी विवाहाच्या बंधनात बांधल्या गेलेल्या पवार दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखाने चालले होते. दोघेही करिअरमध्ये यशाची एकेक पायची चढून पुढे जात होते. मात्र त्याचदरम्यान एका अदृश्य शत्रूने त्यांच्या सुखी संसाराला ग्रहण लावले. काही दिवसांपूर्वी पवन यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यानंतर १५ दिवस कोरोनाशी संघर्ष केल्यानंतर ते जीवनाची लढाई हरले. ही बाब कळताच पत्नी नेहा पवार यांना जबर धक्का बसला. त्यानंतर पतीवर स्वत:पेक्षाही अधिक प्रेम करणाऱ्या नेहा यांनी स्वत:ची जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला प्रेम आणि नंतर विवाहाच्या या स्वप्नवत कहाणीचा असा क्रूर शेवट होईल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. पत्नी नेहा ही एका खासगी कॉलेजात प्राध्यापक होती. तर पती पवन यांची हल्लीच पीएससीच्या माध्यमातून रेंजर पदावर निवड झाली होती. मात्र कोरोनामुळे त्यांना कामावर रुजू होता आले नव्हते.

१९ एप्रिलला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर ३६ वर्षीय पवन पवार यांच्यावर भंवरकुआ येथील खासगी रुग्णालयात पवनवर उचार सुरू होते. मात्र तिथेच त्याचे निधन झाले. ही बाब जेव्हा नेहाला समजली तेव्हा तिचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. त्या दरम्यान, नेहा आणि पवनचे कुटुंबीय पोहोचले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह बडवानी येथे नेण्याची तयारी सुरू होती. तेव्हा नेहा कपडे घेण्याचे कारण देऊन नेहा राजेंद्रनगरमधील सेंच्युरी पार्कमधील घरी पोहोचली. तिथे तिने सर्वांच्या नकळत गळफास घेतला.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार नेहा आणि पवन यांची लव्हस्टोरी १८ वर्षांपूर्वी सुरू झाली होती. मात्र या प्रेम काहाणीची दु:खद अखेर कोरोनाचे केंद्र बनलेल्या इंदूरमध्ये झाली.

राजेंद्रनगर पोलीस ठाण्याचे एएसआय कुंदन यांनी सांगितले की, कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वियोगाने दु:खी नेहाने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.