CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 03:09 PM2020-05-21T15:09:38+5:302020-05-21T15:14:49+5:30

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण समोर आले तर एकाचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्तांमध्ये एक १५ दिवसांचा अर्भकही आहे.

लग्नाआधी ताप आला म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, लग्नानंतर तिचा अहवाल आल्याने नववधूला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. हा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे.

मध्य प्रदेशमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. गुरुवारी राज्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५७३५ झाली आहे. तर २७३३ लोक बरे झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत मध्य प्रदेशमध्ये २६७ लोकांचा मृत्यू झाला आहे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये बुधवारी कोरोनाचे ३९ नवीन रुग्ण समोर आले तर एकाचा मृत्यू झाला. कोरोनाग्रस्तांमध्ये एक १५ दिवसांचा अर्भकही आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नववधू कोरोनाग्रस्त असल्याचे समजल्याने धक्का बसला आहे. यामुळे नवरदेवासह दोन्ही कुटुंबातील ३२ जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या तरुणीचे सोमवारी लग्न झाले. तिच्या घरच्यांनी सांगितले की, मुलीला सात दिवसांपूर्वी ताप आला होता. औषध घेऊनही ठीक झाली नाही. शनिवारी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, यानंतर सोमवारी तिचे लग्न झाले. कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे समजताच माहेरच्या लोकांनी तिला फोन करून याची माहिती दिली.

मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यामधील ही घटना आहे. मंडीदीपच्या सतलापूनमध्ये एक नवविवाहितेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ही तरुणी भैपाळच्या जाटखेडीमध्ये राहते. तिचे १८ मे रोजी सतलापूरच्या मुलाशी लग्न होते.

या घटनेमुळे अब्दुल्लागंजचे प्रशासन हादरले असून बीएमओ डॉक्टर अरविंदसिंह चौहान यांनी सांगितले की, मंडीदीपमध्ये आतापर्यंत इंदौरहून आलेली एका विद्यार्थीनीसह चार कोरोनाचे रुग्ण होते. ते बरे झाले होते.

लग्नानंतर तिचा रिपोर्ट आल्याने तिला थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भोपाळच्या एम्समध्ये तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. तर लग्नाला उपस्थित असलेले दोन्ही पक्षाकडील कुटुंबीय, पाहुणे आणि लग्न लावणाऱ्या भटजीसह ३२जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

मात्र, आता मंडीदीपमध्ये नवविवाहिता सापडली आहे. ती येथील पाचवा रुग्ण आहे. तिच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

असाच एक प्रकार राजस्थानमध्ये घडला होता. एका आरोग्य खात्याचा कर्मचारी मुलगा झाला म्हणून पंचक्रोशीला बत्ताशे, लाडू वाटत फिरत होता. बहिणीच्या गावात वाटून झाल्यानंतर त्याने तिच्याकडे मुक्काम केला होता. याचवेळी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

तर दुसऱ्या एका प्रकारामध्ये आरोग्य विभागाचा कर्मचारी रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळताच भावाच्या बाईकवर बसून पसार झाला होता.