CoronaVirus: पहिल्या लाटेवेळचा अंदाज चुकला! देशात का पसरली कोरोनाची दुसरी लाट? संशोधकांनी शोधले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 11:52 AM2021-05-08T11:52:33+5:302021-05-08T12:20:36+5:30

Corona Virus Antibody sero Survey: कोरोनाची दुसरी लाट भारतात एवढा मोठ्या वेगाने का पसरली याचे कारण समोर आले आहे. पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये तयार झालेल्या अंटिबॉडीने तारले होते.

कोरोनाची दुसरी लाट भारतात एवढा मोठ्या वेगाने का पसरली याचे कारण समोर आले आहे. पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये तयार झालेल्या अंटिबॉडीने तारले होते. (Corona Virus Antibody finished in 93 percent people who covered in Sero survey in Varanasi.)

कोरोना संक्रमण काळात लोकांमध्ये तयार झालेली अँटिबॉडी संपली आहे. जवळपास 93 टक्के लोकांमध्ये पाच महिनेच अंटिबॉडी होती. आता फक्त 7 टक्के लोकांमध्येच ही अँटिबॉडी शिल्लक आहे.

काशीच्या हिंदू विश्वविद्यालय़ाच्या (बीएचयू)मध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाला आंतरराष्ट्रीय जर्नल सायन्समध्ये जागा मिळाली आहे.

देशात अचानक कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर का पसरली या कारणाचा बीएचयूचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांच्या नेतृत्वातील संशोधकांच्या टीमने वाराणसीच्या लोकांचा अभ्यास केला.

यामध्ये असे आढळून आले की, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर-नोव्हेंबर काळातील सीरो सर्व्हेमध्ये ज्या 100 लोकांमध्ये 40 टक्के अँटीबॉडी होती, त्यांच्यात पाच महिन्यांनी म्हणजेच यंदाच्या मार्च पर्यंत केवळ 4 टक्केच अँटीबॉडी शिल्लक राहिली आहे. यामध्ये सात लोक असे मिळाले आहेत ज्यांच्यात पूर्ण अँटिबॉडी आहे.

प्रो. ज्ञानेश्वर यांनी सांगितले की, सीरो सर्व्हेच्या वेळी असा अंदाज लावण्यात आला होता की, ज्या लोकांमध्ये अंटिबॉडी मिळाली आहे ती सहा महिने टिकेल. मात्र, तसे झाले नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. तसेच त्यांच्यात बनलेली अँटीबॉडी ही नाममात्र होती.

पहिल्या लाटेत असे लक्षणे नसलेले लोक कोरोना व्हायरसची शिकार झाले आहेत. अशा लोकांचा मृत्यूही मोठ्या संख्येने झाला आहे. ज्यांच्यात अँटिबॉडी बनली त्यांची सहा महिन्यांपूर्वीच संपली, यामुळे हे लोकदेखील कोरोनाच्या दुसऱ्य़ा लाटेपासून वाचू शकले नाहीत, असे ते म्हणाले.

आधीच्या अंदानुसार जून 2021 पर्यंत लोकांच्या शरिरात अँटिबॉडी असतील व कोरोनाची दुसरी लाट ऑगस्टपर्यंत येण्याची शक्यता होती. तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर लसीकरण देखील पूर्ण झाले असते. हा अंदाज सपशेल खोटा ठरला आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजविला आहे, असे ते म्हणाले.

आता वैज्ञानिकांनी कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत हर्ड इम्‍युनिटी विकसित होणार नाही, असा अंदाज लावला आहे. अशावेळी कोरोनाशी लढण्यासाठी लसच मुख्य शस्त्र असल्याचे ते म्हणाले.

वैज्ञानिकांची टीम लसीकरण केलेल्या लोकांवर संशोधन करत आहे. जे लोक कोरोना संक्रमित नव्हते, आणि ज्यांनी लस घेतली त्यांना अँटिबॉडी विकसित होण्यास चार आठवड्यांचा अवधी लागला. मात्र, ज्यांना कोरोना झाला होता, त्यांच्यामध्ये आठवडा किंवा दहा दिवसांतच अँटिबॉडी बनली, असे ते म्हणाले.

या मागचे मुख्य कारण म्हणजे, या लोकांच्या प्रतिकार शक्तीमध्ये मेमोरी बी सेलची निर्मिती होणे आहे. ही सेल नवीन संक्रमणाची ओळख पटवून प्रतिरोधक क्षमतेला कार्यन्वित करते. असे लोक दुसऱ्या लाटेत लवकर बरे झाले. मात्र, जे पहिल्या कोरोना लाटेत संक्रमित झाले नव्हते त्यांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ दिसत आहे.