Corona Virus: आरोग्य मंत्रालयाचा अलर्ट! देशात अजूनही कोरोनाची दुसरी लाट कायम, ३८ जिल्ह्यांनी वाढवलं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 05:36 PM2021-09-09T17:36:28+5:302021-09-09T17:41:01+5:30

Corona Virus: देशात कोरोना रुग्णसंख्येत घट होताना काही दिसत नसल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं चिंता व्यक्त केली आहे.

देश अजूनही दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे, त्यामुळे गाफील राहून चालणार नाही, असा इशारा आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. कोरोना संबंधिच्या नियमांचं काटेकोर पालन करणं प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजायला हवं असंही आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी आज नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यात त्यांनी केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे.

गेल्या आठवडाभरात देशातील एकूण रुग्णसंख्येमध्ये केरळमधूनच जवळपास ६८.५९ रुग्ण आढळून येत आहेत. म्हणजेच देशातील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांपैकी केरळमध्येच सरासरी ६० टक्के रुग्ण आहेत.

"आपण अजूनही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. त्यामुळे कोरोना प्रोटोकॉलचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे. देशातील ३८ जिल्ह्यांमध्ये आजही दैनंदिन पातळीवर १०० हून अधिक रुग्ण आढळून येत आहेत", असं राजेश भूषण यांनी सांगितलं.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट सातत्यानं कमी होत आहे. पण देशातील ३५ जिल्ह्यांमध्ये अजूनही १० टक्क्यांहून अधिक पॉझिटिव्हिटी रेट असल्याचं भूषण यांनी सांगितलं.

कोरोना लसीचे दोन्ही डोस झालेल्या नागरिकांना कोरोना विषाणू विरोधात पूर्णपणे सुरक्षा मिळाली आहे असं संशोधनात दिसून आलं आहे. तर एक डोस घेतलेले नागरिक ९५ ते ९६ टक्के सुरक्षित आहेत, असं निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितलं.

देशातील कोरोना रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता गुरुवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४३,२६३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे. ४० हजार ५६७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

मंगळवारी कोरोना रुग्णांचा आकडा ३७ हजार ८७५ इतका होता. केरळमधील वाढती आकडेवारी थेट देशाच्या एकूण आकडेवारीवर मोठा परिणाम करत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.

देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३,३१,३९,९८१ इतकी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३,९३,६१४ इतकी आहे. याशिवाय आतापर्यंत ४,४१,७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.