Omicron Variant : धोकादायक! 'कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमध्ये डेल्टापेक्षा दुप्पट म्यूटेशन'; डॉक्टर त्रेहन यांनी दिली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 10:11 AM2021-11-28T10:11:46+5:302021-11-28T10:24:02+5:30

'Omicron' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बेल्जियम आणि बोत्सवानासह इतरही काही देशांमध्ये वेगाने पसरत आहे. 'ओमिक्रॉन' हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारांपेक्षाही अधिक घातक आणि धोकादायक आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या 'ओमिक्रॉन' या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगात दहशत निर्माण केली आहे. यासंदर्भात भारतही सावध झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोरोनासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेतली, यामुळे राज्य सरकारेही याबाबत सतर्क झाली आहेत. या नव्या व्हेरिएंटसंदर्भात दिल्ली सरकारने तज्ज्ञांकडून सूचनाही मागवल्या आहेत.

'Omicron' व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बेल्जियम आणि बोत्सवानासह इतरही काही देशांमध्ये वेगाने पसरत आहे. 'ओमिक्रॉन' हे कोरोनाच्या डेल्टा प्रकारांपेक्षाही अधिक घातक आणि धोकादायक आहे. 'ओमिक्रॉन'मध्ये 30 हून अधिक म्यूटेशन आढळून आले आहेत. तर डेल्टा प्रकारात सुमारे 15 म्यूटेशन आढळले आहेत. यामुळे ओमिक्रॉन डेल्टा पेक्षाही अधिक संक्रमक आहे. असे मेदांता मेडिसिटीचे चेअरमन डॉक्टर नरेश त्रेहन (Dr. Naresh Trehan) यांनी आज तकसोबत बोलताना म्हटले आहे.

लोकांना खबरदारीचा सल्ला देत हार्ट आणि कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ. नरेश त्रेहान म्हणाले, लसीच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून राहू नका. कारण हा व्हेरिएंट लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवरही मात करू शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. तसेच, यात दिलासादायक गोष्ट म्हणजे, कोरोनाचा हा नवा प्रकार RTPCR द्वारेही शोधला जाऊ शकतो. WHO ने याला 'वेरिएंट ऑफ कन्सर्न' श्रेणीत ठेवले आहे,

प्रवाशांची ये-जा थांबवणे आवश्यक - 'ओमिक्रॉन' व्हेरिएंटसंदर्भात इशारा मिळाला आहे, यामुळे आता सरकार, डॉक्टर, आरोग्य सेवा कर्मचारी आणि इतर जबाबदार नागरिकांनी एकत्रितपणे यापासून बचावासाठी योजना आखणे अत्यंत आवश्यक आहे. उदाहरणार्थ, या व्हेरिएंटचा सामना करत असलेल्या देशांतील प्रवाशांची ये-जा बंद करायला हवी. अर्थात, 15 डिसेंबरपासून सुरू होणार्‍या आंतरराष्ट्रीय उड्डाणांसंदर्भात पुर्विचार करावा लागणार आहे.

पुन्हा एकदा पूर्वीसारखीच सावधगीरी बाळगणे आवश्यक - डॉ. त्रेहन यांनी म्हटल्याप्रमाणे, कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने देशातील लोकांनी लग्न, पार्टी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणे सुरू केले आहे. मात्र, आता प्रत्येकाला कोरोना काळात घेतली, तशीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. मास्कसह कोरोनाचे सर्व नियम चार-सहा आठवड्यांपर्यंत व्यवस्थित पाळले गेले, तर हा धोका बऱ्याच अंशी टळू शकतो.

बूस्टर डोससंदर्भात काय म्हणाले डॉ. त्रेहन? - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर बूस्टर डोसची आवश्यक किती? यावर बोलताना डॉ. त्रेहन म्हणाले, डॉक्टर, फ्रंटलाइन आणि आरोग्य सेवा कर्मचार्‍यांना या वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दोन्ही डोस मिळाले आहेत आणि आठ-नऊ महिन्यांत त्यांची प्रतिकारशक्ती कमी झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सर्वात आधी बूस्टर डोस द्यायला हवेत.

बूस्टरसाठी कुठली लस अधिक फायदेशीर - आंतरराष्ट्रीय अनुभवाचा हवाला देत डॉ. त्रेहान म्हणाले, बूस्टर डोससाठी लसीमध्ये बदल व्हायला हवा. उदाहरणार्थ, ज्या लोकांना Covishield चे दोन्ही डोस देण्यात आले आहेत, त्यांना Covaccine चा बूस्टर डोस दिला जावा. लसीचा प्लॅटफॉर्म बदलण्याच्या या प्रयोगामुळे प्रतिकारशक्ती वाढते.

तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका कुणाला? - हा नवा व्हेरिएंट कोणत्या वयोगटातील लोकांवर, केव्हा आणि कशा प्रकारे हल्ला करेल, यासंदर्भात अद्याप अध्ययन केले जात आहे. यासाठी जागतिक आरोग्य संघटनेसह 'ओमिक्रॉन'शी लढा देत असलेल्या देशांना चांगल्या समन्वयाची गरज आहे, जेणेकरून अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या या व्हेरिएंटपासून बचावाचे मार्ग वेळीच निर्माण केले जातील.

नेमका काय आहे 'ओमिक्रॉन' व्हेरिएंट - कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट B.1.1529 दक्षिण अफ्रीकेत समोर आला. हा कोरोनाचा अतापर्यंतचा सर्वाधिक म्यूटेटेड व्हर्जन असल्याचे बोले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ओमिक्रॉन नाव दिले आहे.

तांत्रिक सल्लागारांचा समूह, SARS-CoV-2 व्हायरस इव्होल्यूशन (TAG-VE) वर सातत्याने लक्ष ठेवून आहे. एवढेच नाही, तर विशेष म्यूटेशन आणि म्यूटेशनच्या कॉम्बिनेशनने व्हायरसच्या व्यवहारात काही बदल होतो का, यावरही हा समूह अभ्यास करत आहे. महत्वाचे म्हणजे डब्ल्यूएचओने Omicron व्हायरसला VOC (व्हेरिएंट ऑफ कंसर्न) अर्थात चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.

मेदांता मेडिसिटीचे चेअरमन डॉक्टर नरेश त्रेहन...