Corona: खामोश! कंपन्या नाही, मोदी आणि राज्य सरकारे ठरवणार किंमती; आणखी दोन लसी येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2021 10:25 AM2021-01-13T10:25:40+5:302021-01-13T10:30:56+5:30

Corona Vaccine Price: कोरोना लसींच्या किंमती किती असतील यावरून वाद सुरु झाले आहेत. सीरमचे पुनावाला सांगतात 10 कोटी डोस 200 रुपये आणि त्यानंतरचे 1000 रुपयांना विकणार, तर कोणी मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्र आणि राज्य सरकारे तोडगा काढणार आहेत.

तीन दिवसांनंतर जगातील सर्वात मोठे लसीकरण सुरु होणार आहे. मंगळवारपासून कोरोनावरील लस विविध राज्यांना मिळण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातील सीरम इन्स्टीट्यूटने ब्रिटनच्या कंपनीसोबत मिळून तयार केलेली कोविशिल्ड आणि आणि हैदराबादची स्वदेशी लस कोव्हॅक्सिनची डिलिव्हरी सुरु झाली आहे.

याचबरोबर या लसींच्या किंमती किती असतील यावरून वाद सुरु झाले आहेत. सीरमचे पुनावाला सांगतात 10 कोटी डोस 200 रुपये आणि त्यानंतरचे 1000 रुपयांना विकणार, तर कोणी मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यावर आता केंद्र आणि राज्य सरकारे तोडगा काढणार आहेत.

देशात सध्या दोन लसींना आपत्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे. पुढील महिनाभरात आणखी दोन लसी भारताला मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये आणखी एक स्वदेशी कंपनी झायडस कॅडिला कंपनीची लस असून चौथी लस ही रशियाची वादात सापडलेली स्पूतनिक-5 आहे. सध्या या दोन्ही लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे

सरकारच्या योजनेनुसार देशात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चार आणि एप्रिलच्या शेवटी आणखी एक लस अशा पाच लसी मिळणार आहेत. तोपर्यंत देशातील तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि सुरक्षा जवानांना कोरोना लस दिली जाणार आहे.

बाजारात पाच कंपन्यांच्या लसी उपलब्ध झाल्या की त्यांच्या किंमतींमध्येही घट होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारांसोबत चर्चा करून लसींच्या किंमती ठरविणार आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत कोरोना लसीकरणाचा खर्च केंद्राने करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी य़ांनी मुख्यमंत्र्यांना आश्वासने दिले की, पुढील दोन तीन महिन्यांत चार ते पाच लसी येणार आहेत. तेव्हा पुन्हा बैठक बोलावून किंमत आणि बजेटवर चर्चा केली जाईल.

सध्याच्या योजनेनुसार तीन कोटी लोकांना पंतप्रधान मदत निधीतून कोरोना लसीकरण मोफत दिले जाणार आहे. तर सामान्य लोकांसाठी एका डोसची किंमत 500 ते 1000 रुपये असण्याची शक्यता आहे. सध्या तरी अशी लस बाजारात उपलब्ध नसली तरीही जूननंतर ती बाजारात येण्याची शक्यता आहे.

सर्वात आधी फायझर कंपनीने कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी मागितली होती. मात्र, केंद्र सरकारने ही लस होल्डवर ठेवली असून सीरम आणि भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. त्यातही भारत बायोटेकची लस ही पर्याय म्हणून ठेवण्यात आली आहे. यामुळे आता पाचवी लस कोणती यावर चर्चा होऊ लागली आहे.

नोवल व्हॅक्सिन : बॉयोलॉजिकल ई नोवल व्हॅक्सिनवर सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहेत. जवळपास दोन महिने ही चाचणी सुरु राहील.

एमआरएनए व्हॅक्सिन : स्वदेशी लसीच्या स्पर्धेत असलेली तिसरी कंपनी म्हणजे जेनेवा फॉर्मास्युटिकल. या कंपनीच्या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे भारत सरकारच्या संशोधकांनी ही लस तयार केली आहे.