Corona Vaccination: १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कुठली लस दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसं होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 11:51 AM2021-12-26T11:51:08+5:302021-12-26T11:56:02+5:30

Corona Vaccination For Children: सध्या जगाला भयग्रस्त करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटामधील मुलांसाठी लसीकरणाची घोणार केली आहे.

सध्या जगाला भयग्रस्त करणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटामधील मुलांसाठी लसीकरणाची घोणार केली आहे. या घोषणेनंतर मुलांना कोणती लस दिली जाणार, नोंदणी कशी केली जाणार, लसीकरणामध्ये ३ महिन्यांचे अंतर असल्यास मुले परीक्षा कशी देणार, असे अनेक प्रश्न पालकांना पडले आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.

मुलांच्या लसीकरणाची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुठल्या लसीचा उल्लेख केला नव्हता. मात्र डीसीजीआयने कोव्हॅक्सिनच्या मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीला मान्यता दिली आहे. १२ ते १८ वर्षांदरम्यानच्या मुलांना ही लस आपातकालीन परिस्थितीत देता येणार आहे. ही लस १२ वर्षांवरील मुलांनाच दिली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार मुलांच्या या लसीसाठी भारत बायोटेकला ऑर्डर देण्याची शक्यता आहे. मात्र याबाबतची सविस्तर माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान, कोव्हॅक्सिनच्या आधी मुलांसाठी झायडस कॅडिलाच्या लसीबाबतची चर्चा झाली होती. त्या लसीचे तीन डोस घेणे अनिवार्य आहे. तसेच त्यासाठी इंजेक्शनची गरज भासत नाही. आता सरकारने आपातकालीन वापरासाठी कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.

सध्या देशामध्ये जी व्यवस्था आहे त्यानुसार कोविन अॅपवर नोंदणी करावी लागते. त्यानंतर स्लॉट मिळतो. मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप काही स्पष्ट करण्यात आलेले नाही. या अॅपवर आधारकार्डच्या माध्यमातून स्लॉट बूक केला जातो. दरम्यान, अनेक मुलांचे आधारकार्ड नसते. अशा परिस्थितीत मुलांना लस देण्यासाठी वेगवेगळी लसीकरण केंद्र तयार केली जाती. तसेच मुलांना शाळा किंवा घरी लस देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

१८ वर्षांवरील लोकांना लसीच्या दोन डोसमध्ये ९० दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. मध्ये यातील अंतर कमी करण्यात आले होते. दरम्यान, मुलांसाठीचे लसीकरण ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे. तज्ज्ञांच्या मते मुलांच्या परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये असतील तर त्यांच्या दुसऱ्या डोसची तारीख जवळ येईल, तसेच किमान एक डोस घेतला असेल तरी मुले संसर्गापासून बऱ्यापैकी सुरक्षित होतील.

सध्या देशामध्ये मोफत आणि निश्चित किमतीमध्ये लस घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. काही लोक सरकारकडून तयार करण्यात आलेल्या सेंटरवर जाऊन लस घेत आहेत. तर काहीजण खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेत आहेत. मुलांसाठीही तशीच व्यवस्था राहू शकते.

ओमायक्रॉनच्या संकटादरम्यान, बुस्टर डोसवर सखोल चर्चा सुरू आहे. २५ डिसेंबरच्या संध्याकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुस्टर डोसऐवजी प्रिकॉशन डोस शब्द वापरला होता. त्यामुळे बुस्टर डोस आणि प्रिकॉशन डोस हे वेगवेगळे आहेत का? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र डॉक्टरांच्या मते मोदींनी बुस्टर डोसचा उल्लेखच प्रिकॉशन डोस असा केला आहे. त्याचा मूळ हेतू हा इम्युनिटी वाढवणे हाच आहे.