Corona Vaccination : कोरोना लस घ्या अन् मिळवा 51 हजार रुपयांचे बक्षीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 02:53 PM2021-06-22T14:53:33+5:302021-06-22T15:03:11+5:30

Corona Vaccination : लोकप्रतिनिधी देखील लसीसाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी पुढे येत आहेत.

देशात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. सोमवारी 86.16 लाख लोकांना लस देण्यात आली. हा लसीकरणाचा आकडा एका दिवसातील रेकॉर्ड ठरला आहे.

हा लसीकरणाचा आकडा न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येच्या दुप्पट आहे. तर मध्य प्रदेशात या दिवशी देशातील सर्व राज्यांच्या तुलनेत 15 लाखाहून अधिक लोकांचे लसीकरण करण्यात आले.

लोकप्रतिनिधी देखील लसीसाठी लोकांना प्रेरित करण्यासाठी पुढे येत आहेत. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील मैहरचे भाजपाचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी यासंबंधी लस घेणाऱ्यांसाठी लॉटरी जाहीर केली आहे.

आमदार नारायण त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, जे लोक 23 जून ते 30 जून यादरम्यान लस घेतील, त्यांची नावांची चिठ्ठी काढली जाईल. या लॉटरीत पहिल्या नावाला 51 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

त्याचप्रमाणे ज्यांची नावे दुसऱ्या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर येतील, त्यांना अनुक्रमे 21 हजार, 11 हजार आणि 5 हजार असे बक्षीस देण्यात येईल. याशिवाय 25 जणांना एक हजार रुपये दिले जातील.

चिठ्ठीनुसार, लस घेणाऱ्या 25 महिलांना प्रत्येकी एक प्रेशर कुकर बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. देवीधाममधील एका बॉक्समध्ये लस मिळालेल्या लोकांच्या नावांच्या चिठ्या ठेवून लॉटरी काढली जाईल.

दरम्यान, मैहरमधील भाजपाच्या आमदारांनी यापूर्वीच 100% लसीकरणावर 3 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि मैहर नगरपालिकेला 25 लाख रुपयांची घोषणा केली आहे.

भाजपाचे आमदार त्रिपाठी यांचे नाव सतत चर्चेत राहते, परंतु यावेळी ते पक्षविरोधी वक्तव्यामुळे नव्हे तर कोरोना लसीकरणासाठी बक्षिसे जाहीर केल्यामुळे चर्चेत आहेत.

आमदार नारायण त्रिपाठी यांनी सांगितले की कोरोना महामारीच्या काळात जीव वाचवण्यासाठी सर्वात जास्त सुरक्षित लस आहे. त्यामुळे मी मैहरच्या लोकांना सर्व लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन लस घ्यावी अशी विनंती करतो.

याचबरोबर, 100% लसीकरण ज्या पंचायत क्षेत्रात होईल, त्याच्या विकासासाठी 10 लाख रुपये दिले जातील. मैहर शहरात असे झाल्यास त्याच्या विकासासाठी 25 लाख रुपये दिले जातील, असे आधीच सांगितले आहे, असे आमदार नारायण त्रिपाठी म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!