भारताचे मंत्रालय आणि कंपन्या चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 08:36 PM2020-06-23T20:36:11+5:302020-06-23T21:48:55+5:30

सिंगापूरस्थित सायबर इंटेलिजेंस कंपनी Cyfirma ने दावा केला आहे की, चीनचा पॉप्युलर हॅकर ग्रुप भारताला लक्ष्य करीत आहेत. रिपोर्टनुसार, चिनी हॅकर्स भारतीय संरक्षण मंत्रालयासह मोठ्या भारतीय कंपन्यांनाही लक्ष्य करीत आहेत.

रिपोर्टनुसार, चिनी सरकारशी संबंध असणारे हॅकर ग्रुप भारतीय व्यवसायावर पद्धतशीर हल्ला करीत आहेत. Cyfirmaच्या म्हणण्यानुसार, संरक्षणसह चीनी हॅकर ग्रुप भारतातील दूरसंचार कंपन्यांना लक्ष्य करीत आहेत.

या कंपन्यांमध्ये एअरटेल, बीएसएनएल, रिलायन्स जिओसह काही फार्मा कंपन्या आहेत. चिनी हॅकर्स सिप्ला, सन फार्मा यांनाही लक्ष्य करीत आहेत. या रिपोर्टनुसार एमआरएफ आणि एल अँड टी सारख्या कंपन्यांनाही चिनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत.

Cyfirmaच्या या अहवालात असे म्हटले आहे की, हॅकर्स या कंपन्यांकडून संवेदनशील माहिती चोरण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामध्ये ट्रेड सीक्रेट्स सुद्धा असतात. कोणत्याही कंपनीसाठी हा अत्यंत संवेदनशील डेटा आहे.

Cyfirmaने म्हटले आहे की, या संभाव्य सायबर हल्ल्यामागे Gothic Panda आणि Stone Panda यांचा हात असल्याचे हॅकर्सच्या आयपी अ‍ॅड्रेस अॅनालिसिसच्या आधारे समजले आहे. हे दोन्ही पॉप्युलर हॅकर्स आहेत. त्यांचे चीनी सरकारशी संबंध आहेत.

सायबर इंटेलिजेंस फर्मच्या एका रिपोर्टनुसार, चीनशी संबंध असलेल्या या हॅकर्सनी भारताच्या तीन मंत्रालयांना लक्ष्य केले आहे. यामध्ये संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा समावेश आहे.

चीनशी संबंधित हे हॅकिंग ग्रुप यापूर्वीही भारत, कॅनडा, जपान आणि ब्राझील यासारख्या देशांना लक्ष्य करीत आले आहेत. दरम्यान, सरकारकडून यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आले नाही.

विशेष म्हणजे, गलवानमध्ये भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर भारतील लोक चिनी वस्तूंवर बहिष्कार घालत आहेत.

दुसरीकडे, भारत-चीन सीमेवरील तणाव पाहता, चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असून यासाठी ते एका ईमेलचा वापर करत आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.

चिनी हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लॅन केला आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. चीनी हॅकर्स ncov2019@gov.in या ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. या सायबर हल्ल्यामध्ये भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे.

तुम्हाला आकर्षित करणारा/ आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला ईमेल पाठवला जाईल.जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit. त्या इमेल मध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाऊनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

हा खोटा इमेल covid2019@gov.in / ncov2019.gov.in अश्या प्रकारच्या खोट्या सरकारी इमेल वरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते.

महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, वरील दाखविल्याप्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in / ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नये किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नये.

सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईल साठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँन्टी व्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईल मधील अॅप नियमितपणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा,तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या.

प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंक वर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये.खोट्या आणि प्रलोभने देणा-या इमेल आणि वेबसाईट पासून सावध राहा.

असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे कि युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात येत आहे.