आपण यांना पाहिलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 03:09 PM2018-09-25T15:09:00+5:302018-09-25T15:13:37+5:30

सध्या पेट्रोलचा दर 90 रुपयांच्या वर गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर वाढल्यानं पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणं सरकारच्या हातात नाहीत, असं भाजपाचे केंद्रातील मंत्री सांगत आहेत. मात्र हेच नेते कधीकाळी पेट्रोलचे दर 75 रुपयांच्या आसपास असताना आंदोलन करुन सरकारचा निषेध करायचे.

सध्या सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री आहेत. भाजपा विरोधात असताना त्या इंधन दरवाढीवरुन तुटून पडायच्या. भाजपाच्या त्या तडफदार सुषमा स्वराज कुठे गेल्या, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. आज अरुण जेटली विरोधात असते, तर अशाच प्रकारे त्यांनी सिलेंडर आणून सरकारला जाब विचारला असता. मात्र ही मंडळी सध्या मंत्रीमंडळात आहेत.

सध्या केंद्रात मंत्री असलेल्या स्मृती इराणी त्यावेळी कायम आंदोलनात पुढे असायच्या. धरणं आंदोलन असो किंवा मग सरकारविरोधातील घोषणाबाजी इराणी नेहमीच सरकारचा कडाडून निषेध करायच्या. या आठवणी इंधन दरवाढीमुळे होरपळणाऱ्या जनतेच्या मनात आजही ताज्या आहेत.

पेट्रोल 70-75 रुपये दरानं मिळत असताना रवीशंकर प्रसाद सायकलवरुन यायचे. सरकारचा निषेध करायचे. आज पेट्रोल नव्वदीच्या पलीकडे गेलंय. मात्र प्रसाद काही सायकलवरुन जाताना दिसत नाहीत. ते प्रसाद हरवले की त्यांच्याकडची सायकल हरवली, हा प्रश्नच आहे.

असं म्हणतात, जनतेची कणव फक्त एकाच पक्षाला असते आणि हा पक्ष असतो, विरोधी पक्ष. भाजपाचं तसंच झालंय की काय हा प्रश्न आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेल स्वस्त असतानाही देशात पेट्रोल, डिझेल महाग होतं. आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाची किंमत वाढतानाही देशात पेट्रोल, डिझेलची किंमत जास्तच आहे. सामान्य जनता तेव्हाही होरपळत होती, आजही होरपळतेय. फरक इतकाच आहे, त्यावेळी जनतेसोबत रस्त्यावर असणारा पक्ष त्यावेळी विरोधात होता, आज तो सत्तेत आहे.