CoronaVirus Live Updates : ...अन् पुन्हा एकदा रंगली भीडवाडा मॉडेलचीच चर्चा; आता ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केली कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 08:22 PM2021-04-30T20:22:24+5:302021-04-30T20:49:48+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राजस्थानमधील भीलवाडा येथील कंटेन्मेंट मॉडेल खूप चर्चेत होतं. मात्र पुन्हा एकदा या मॉडेलची जोरदार चर्चा रंगली आहे.

देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,87,62,976 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,08,330 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,86,452 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3498 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात असतानाच विविध उपाय केले जात आहेत.

कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान राजस्थानमधील भीलवाडा येथील कंटेन्मेंट मॉडेल खूप चर्चेत होतं. मात्र पुन्हा एकदा या मॉडेलची जोरदार चर्चा रंगली आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यात भीलवाड्याने कमाल केली आहे.

राजधानी दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्येही आरोग्य सेवांचा तुटवडा जाणवत आहे. देशात ऑक्सिजन कमतरतेमुळे हाहाकार उडाला असताना येथील 8 हजार रुग्णांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भीलवाडा येथील महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात (Mahatma Gandhi District Hospital) 430 बेडस आहेत. यापैकी 300 बेडस केवळ कोरोनाबाधित रुग्णांसाठी आहेत.

सध्या या रुग्णालयात बेड्सची कमतरता असली तर ऑक्सिजन पुरवठा मात्र सुरळीत सुरू आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अरुण गौर यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, राजस्थान सरकारने अगदी वेळेवर काही चांगले धोरणात्मक निर्णय घेतले.

आम्ही सरकारला 4 महिन्यांपूर्वी आगामी काळातील धोके आणि तुटवडा यांची कल्पना दिल्यावर सरकारने तातडीने या रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट उभारला अशी माहिती गौर यांनी दिली आहे.

सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष देत तातडीने सुविधा उभारल्या. हेच एकमेव कारण आहे की अन्य राज्यांच्या तुलनेत राजस्थान अद्यापही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करीत आहे अशी माहिती दिली आहे.

आमच्या या ऑक्सिजन प्लांटमध्ये (Oxygen Plant) दररोज 100 सिलिंडर उत्पादन होते. तसंच राज्यातील अन्य प्लांटमधूनही ऑक्सिजन पुरवठा होतो. त्यामुळे रुग्णांकरिता आवश्यक ऑक्सिजनचा पुरेसा साठा आमच्याकडे उपलब्ध आहे असं म्हटलं आहे.

महात्मा गांधी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा 30 ते 40 सिलिंडर होता. आता आम्हाला 400 ते 500 सिलिंडरची गरज भासत आहे. त्यापैकी 100 सिलेंडर आमच्या प्लांटमधून उपलब्ध होतात.

ऑक्सिजन पुरवठ्या व्यतरिक्त हे रुग्णालय रुग्णांकरिता पुरेशा प्रमाणात बेडसची (Beds)व्यवस्था सातत्याने करीत आहे. बेडस कमी पडू नये म्हणून रुग्णालयाच्या आवारातही बेडसच्या व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे.

भीलवाडात गेल्या 24 तासांत 535 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशभरातील अनेक रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या, बेड्सची आणि ऑक्सिजनची कमतरता सर्वत्र जाणवत आहे. काही रुग्णालयांनी आपल्या रुग्णालयाबाहेर बेड आणि ऑक्सिजन नसल्याचं पोस्टर लावले आहेत.

ऑक्सिजनची कमतरता असल्याने आपल्या रुग्णाला इतर ठिकाणी हलवा असं रुग्णालयाच्या वतीने देखील सांगण्यात आलं आहे. डॉक्टर्सही या गंभीर परिस्थिती पुढे हतबल झाले आहेत. याच दरम्यान एक दिलासादायक घटना समोर आली आहे. ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासाठी आता पार्लर सुरू करण्यात आले आहेत.

देशातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत असताना केरळमध्ये ऑक्सिजन पार्लरची अनोखी शक्कल लढवण्यात आली असून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत आहे. कोट्टायम जिल्हा प्रशासन संपूर्ण जिल्ह्यात लवकरच ऑक्सिजन पार्लर्स उघडणार आहेत.

मानरकद येथील सेंट मेरी चर्च ऑडिटोरियममधल्या कोविड केअर सेंटरमध्ये अशा एका ऑक्सिजन पार्लरचं (Oxygen Parlour) उद्घाटन करण्यात आलं आहे. हा केरळमधील पहिलाच उपक्रम आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा वेळी ज्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत. ते रुग्ण रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी (Blood Oxygen Level) तपासू शकतात आणि त्यांना गरज असेल तर ऑक्सिजन पार्लरमधून त्यांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.