२० दिवसांत तयार झालं अनोखं रुग्णालय, अवघ्या ३ तासांत कोठेही होईल शिफ्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 05:51 PM2021-10-08T17:51:44+5:302021-10-08T17:57:22+5:30

ballon hospital : या रुग्णालयात रुग्णांसाठी 3-स्टार रुग्णालयासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बैतूलमध्ये एक रुग्णालय तयार करण्यात आले आहे. हे रुग्णालय पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही की, आपत्कालीन परिस्थितीत ते फक्त 3 तासात कुठेही हलवता येते. ही या रुग्णालयाची खासियत आहे.

या रुग्णालयात रुग्णांसाठी 3-स्टार रुग्णालयासारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष गोष्ट म्हणजे हे रुग्णालय दुमडले (फोल्ड) जाऊ शकते. त्यामुळे याला बलून रुग्णालय म्हटले जात आहे.

माहितीनुसार, कोरोनाची तिसरी संभाव्य लाट लक्षात घेऊन हे रुग्णालय तयार करण्यात आले आहे. हे पीटी मेडिकल कंपनीने अमेरिकन इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने तयार केले आहे. यामध्ये 50 रुग्णांना एकाच वेळी दाखल करता येईल.

यात आयसीयू तसेच ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था आहे. हे रुग्णालय तयार केल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता बेतुलच्या जिल्हा रुग्णालयासह कोरोना रुग्णांसाठी 150 बेडची सोय आहे. दरम्यान, हे दोन मोठे हायटेक बलून आहेत. यामध्ये हवा भरून सर्व सुविधांसह 50 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

हे रुग्णालय अवघ्या 20 दिवसात तयार झाले आहे. हे बलून रुग्णालय बनवण्यासाठी वापरलेले साहित्य फायर प्रूफ, स्क्रॅच प्रूफ आणि वॉटर प्रूफ आहे. येथे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. आतून ते पूर्णपणे सेंट्रलाइज्ड एसीसह सुसज्ज आहेत. या रुग्णालयाचे तापमान देखील नियंत्रित करता येते.

हे रुग्णालय तयार करण्यासाठी खर्च 1.5 कोटी आहे. ते उभे राहण्यासाठी एअर कॉम्प्रेसर मोटर्स बसवण्यात आल्या आहेत. कॉम्प्रेसरमधून गरम हवा बलून टेंटमध्ये पाठवली जाते. यानंतर, हॉस्पिटल काही तासांत उभे राहते.

या बलूनची लांबी 102 फूट आणि रुंदी 80 फूट आहे. याच्या छतावर लोखंडी ब्रेकेट बसवण्यात आले आहेत, जेणेकरून रुग्णालय वरून मजबूत होईल. त्यात एसीपी शीटचा वापर करण्यात आला आहे. यापासून पार्टिशन आणि फ्लोअर बनवले आहेत.

या रुग्णालयामध्ये 8 आयसीयू बेड, 15 ऑक्सिजन बेड आणि 27 सामान्य बेड आहेत. निर्माता कंपनीने ऑक्सिजन पाइपलाइनचा सपोर्ट तयार करून बेड, स्टँडसह रुग्णांना मिळणाऱ्या इतर सुविधांची सुद्धा व्यवस्था केली आहे.

रुग्णालयामध्ये रिसेप्शन एरिया, डॉक्टर लाउंज, एक्झामिनेशन हॉल, डॉक्टर, नर्स आणि रुग्णांसाठी शौचालये, रुग्णांना दाखल करण्याव्यतिरिक्त रुग्णालयात ऑक्सिजनचीही काळजी घेण्यात आली आहे.

साईट इन्चार्ज रुपेश चौरासे यांनी सांगितले की, हॉस्पिटल सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या बाहेर एक टीन शीट बनवण्यात आली आहे. रुग्ण आणि रुग्णालयाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास गार्ड तैनात केले जातील.