खत्तरनाक...! स्वदेशी रायफल मिनिटाला तब्बल 600 गोळ्या झाडणार; शत्रूच्या चिंधड्याच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 03:53 PM2019-10-08T15:53:20+5:302019-10-08T16:03:02+5:30

संरक्षण उद्योगामध्ये वेगाने प्रगती करणाऱ्या अमेठीमध्ये लवकरच जगातील सर्वात खतरनाक रायफलचे उत्पादन सुरू होणार असून भारतीय जवानांची ताकद वाढणार आहे. एके 203 या रायफलचे लवकरच उत्पादन सुरू होणार असून ही रायफल एका मिनिटामध्ये 600 गोळ्या झाडण्याची क्षमता ठेवते.

मेक इन इंडियाच्या अंतर्गत अमेठीतील शस्त्रास्त्रे निर्मिती कारखान्यामध्ये 6.7 लाख कलाश्निकोव्ह रायफलींची निर्मिती करण्यात येणार आहे. भारतीय सैन्यदल तांत्रिक अटींना मंजुरी देत आहे. पुढील महिन्यात व्यावसायिक निविदा दाखल केली जाईल. यानंतर अमेठामध्ये रायफल निर्मितीचा रस्ता मोकळा होणार आहे.

इंडो-रशियन रायफल प्रायव्हेट लिमिटेड जॉईंट व्हेंचरनुसार एके-203 रायफलींच्या उत्पादनाचा करार केला जाईल. याच वर्षी मार्चमध्ये या कारखान्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, अद्याप मागणी मिळालेली नाही. रशिया या अत्याधुनिक रायफलचे तंत्रज्ञान भारताला सोपविणार आहे. पहिल्या टप्प्यात 6.7 लाख रायफली बनविल्या जाणार आहेत.

यानंतर निमलष्करी दलालाही या रायफली मिळणार आहेत. तसेच एक लाख रायफलींच्या गरजेच्या भागांना रशियाहून आणले जाणार आहे. अमेठीमध्ये या रायफलींची निर्मिती सुरू झाली आहे. एक रायफल जवळपास 1000 डॉलरला पडणार आहे.

ही रायफल जगातील सर्वात घातक शस्त्रांपैकी एक आहे. यामुळे भारतीय लष्कराच्या जाम होणाऱ्या इन्सास रायफलींपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच ही रायफल हलकी असणार असून हाताळणेही सुलभ होणार आहे.

या रायफलमध्ये 7.62 एमएमच्या गोळ्या वापरल्या जातात. ही रायफल मिनिटाला 600 गोळ्या म्हणजेच एका सेकंदाला 10 गोळ्या डागल्या जातात.

ही रायफल अॅटोमॅटीक आणि सेमी अॅटोमॅटीक या दोन्ही मोडवर चालते. तसेच 400 मीटरपर्यंत मारकक्षमता आहे. गोळ्यांसह या रायफलचे वजन 4 किलो होते.