Adar Poonawalla On Covshield : 'ज्याची कल्पनाही केली नव्हती अशा द्विधा मनस्थितीत...;' Covishield च्या उत्पादनावर का म्हणाले अदर पूनावाला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 08:45 AM2021-12-09T08:45:43+5:302021-12-09T08:59:00+5:30

Adar Poonawalla On Covshield : बूस्टर डोस आणि लसींच्या आवश्यकतेबाबत आम्ही केंद्राला यापूर्वीच पत्र लिहिलंय, आम्हाला त्यांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे : अदर पूनावाला

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन (Omicron) या कोरोना व्हेरिअंटनं जगाला चिंतेत टाकलं आहे. ओमायक्रॉन बाबत भारतातही सतर्कता बाळगली जात आहे. दरम्यान, या विषाणूचा अधिक प्रसार होत असला तरी तो तितका घातक नसल्याचंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

यादरम्यान सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute Of India) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी मंगळवारी मोठं वक्तव्य केलं. कंपनी महिन्याला उत्पादन करत असलेल्या डोसमध्ये ५० टक्क्यांची कपात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारकडून लसीच्या डोसची योग्य ऑर्डर मिळत नसल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं अदर पूनावाला म्हणाले. CNBC-TV18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत पूनावाला यांनी लसीच्या उत्पादनावर भाष्य केलं.

“मी सध्या खरंच द्विधा मनस्थितीत आहे, ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. आम्ही एका महिन्यात २५० मिलियन डोसेसचं उत्पादन करत आहोत. भारतानं लोकसंख्येच्या एका मोठ्या वर्गाचं लसीकरण केलंय हे चांगलंच आहे. आम्ही आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या सर्व ऑर्डर्स पूर्ण केल्या आहेत,” असं अदर पूनावाला म्हणाले.

“परंतु आता कोणत्याही अधिक ऑर्डर आल्या नाहीत, म्हणून आम्ही कोविशील्डच्या उत्पादनात ५० टक्क्यांची कपात करत आहोत,” असंही ते म्हणाले. शिवाय पुढील तिमाहित कोविशील्डच्या निर्यात ऑर्डरमध्ये तेजी येऊ शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जर बूस्टर डोससाठी आणखी लसींची गरज भासल्यास आम्ही केंद्र सरकारला यापूर्वीच पत्र लिहिलं आहे. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत, असंही पूनावाला यावेळी म्हणाले.

“सध्या आमच्याकडे ५०० मिलियन लसींचा स्टॉक आहे. यापैकी अर्धा पुढील दोन महिन्यांमध्ये संपण्याची शक्यता आहे. या लसीची शेल्फ लाइफ दोन महिन्यांची आहे. यामुळेच या स्टॉकसोबत काय करायचं आहे हे आम्हाला ठरवावं लागेल,” असंही पूनावाला म्हणाले.

जगभरात जनजीवन पूर्ववत होत असतानाच आता ओमायक्रॉन (Omicron) या विषाणूचा प्रादुर्भाव पसरत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिअंटविरोधात कोविशील्ड (Coronavirus Vaccine Covishield) ही किती प्रभावी आहे हे येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये समजेल, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी यापूर्वी दिली होती.

"ओमायक्रॉन हा विषाणू किती गंभीर आहे किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. परंतु ओमायक्रॉनकडे पाहता बूस्टर डोस शक्य आहे," असंही पूनावाला म्हणाले केलं होतं.

दरम्यान, सरकारनं आता सर्वांनाच प्रथम दोन डोस देण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. 'दरम्यान, कोविशील्ड ही लस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटचा सामना करण्यास सक्षम होती, तसंच रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यू होण्याचीही शक्यता कमी होती,' असं लॅन्सेन्टच्या अहवालातून सांगण्यात आलं होतं.

कोविशील्डच्या ओमायक्रॉन या विषाणूवरील प्रभावीपणावर सध्या अभ्यास सुरू आहे आणि आपल्याला काही आठवड्यांची वाट पाहावी लागेल. ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकांकडून यावर संशोधन सुरू आहे. तसंच त्यांच्या निष्कर्षांच्या आधारावर येत्या सहा महिन्यांमध्ये आम्ही नवी लस आणू शकतो जी बूस्टर डोस प्रमाणे सादर केली शकतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जर सरकारनं बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही लसीचा पुरवठा करण्यासाठी तयार आहोत. पूनावाला यांच्या माहितीनुसार खासगी बाजारपेठेत बूस्टर डोस हा ६०० रूपयांना मिळो शकतो, तसंच तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. परंतु त्यापूर्वी दोन्ही डोस देणं आवश्यक असल्याचंही ते यापूर्वी म्हणाले होते.