देशाच्या इतिहासात २१ एप्रिलचं महत्व काय आहे?; खुद्द शरद पवारांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 03:11 PM2020-04-21T15:11:54+5:302020-04-21T15:23:46+5:30

राज्यावर अनेक संकटे आली पण प्रत्येक संकटावर आपण यशस्वीरीत्या मात केली आहे. लातूरचा भूकंप असो, मुंबईतील पाऊस असो अशी अनेक उदाहरणं राज्याच्या इतिहासात आहेत. आजच्या २१ एप्रिल या दिवशी घडलेल्या एका गोष्टीचं मला आवर्जून स्मरण होतं.

पोलीस प्रशासन,वैद्यकीय सेवा,शासकीय यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत. त्यांना देशाची व राज्याची स्थिती सावरायची आहे. या सर्वांबद्दल आत्मीयता दाखवण्याची, त्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्याची गरज आहे. याची काळजी आपण घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे.

याच दिवशी देशातील सिव्हिल सर्व्हंटस् अर्थात प्रशासकांची पहिली तुकडी बाहेर पडल्यावर त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले होते. ते म्हणाले होते की, माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्हा सर्वांच्या माध्यमातून देशाला एक भक्कम आधार मिळेल.

प्रशासकांचा उल्लेख सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘स्टील फ्रेंड ऑफ इंडिया’ असा केला होता. सरदार पटेल यांच्यासारख्या अनुभवी माणसाने जो संदेश प्रशासन यंत्रणेला दिला तीच परंपरा आजही कायम आहे व आपल्याला जपायची आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणेचे मी अभिनंदन करतो व कृतज्ञता व्यक्त करतो.

भारत सरकारकडून दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी देशासाठी आणि नागरिकांसाठी दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते.

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी १९४७ मध्ये दिल्लीच्या मेटकॅल्फ हाऊस येथे प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांना याच दिवशी संबोधित केले होते. तेव्हा त्यांनी नागरी सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘स्टील फ्रेम ऑफ इंडिया’ म्हणून संबोधले. २१ एप्रिल रोजी हा कार्यक्रम झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आजच्या दिवशी प्रशासकीय अधिकाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भारतात कोविड १९ ला यशस्वीरित्या पराभूत करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. गरजवंतांना मदतीसाठी सरसावणाऱ्या या अधिकाऱ्यांनी या संकटकाळी घड्याळाच्या काट्याकडे न बघता २४ तास लोकांना सेवा देत आहे अशा शब्दात प्रशासकीय अधिकाऱ्यांना शबासकी दिली.