दिलासादायक! या तारखेपासून देशभरात पूर्ण क्षमतेने सुरू होणार रेल्वेसेवा, प्रवाशांना होणार मोठा फायदा

By बाळकृष्ण परब | Published: February 13, 2021 10:11 AM2021-02-13T10:11:11+5:302021-02-13T10:24:38+5:30

Indian Railway Update : आता देशातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तसेच सर्व व्यवहारही हळूहळू सुरळीत होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे.

गतवर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाल्यानंतर रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. नंतर टप्प्याटप्प्याने काही विशेष मेल,एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या असल्या तरी देशातील रेल्वेसेवा अद्याप पूर्णपणे रुळावर आलेली नाही.

मात्र आता देशातील कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी झाला आहे. तसेच सर्व व्यवहारही हळूहळू सुरळीत होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी आली आहे. देशातील रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे.

रेल्वे मंत्रालयामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ एप्रिलपासून सर्व पँसेंजर गाड्या रुळावरून धावण्यास सुरुवात होणार आहेत. यामध्ये सामान्य, शताब्दी आणि राजधानीसह सर्व प्रकारच्या रेल्वेगाड्यांचा समावेश असेल.

पुढील महिन्यात असलेल्या होळीमुळे रेल्वेच्या प्रवासी वाहतुकीला मोठी मागणी असेल. त्यातच कोरोनाची सध्याची स्थिती पाहता रेल्वेसेवा १०० टक्के क्षमतेने सुरू करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. आता पीएमओकडून लवकरच याला परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

सद्यस्थितीत देशभरात रेल्वेची प्रवासी वाहतूक सेवा ६५ टक्के क्षमतेने सुरू आहे. बऱ्याच मेल, एक्स्प्रेस गाड्या सुरू झाल्या आहेत. त्याबरोबरच जवळपास सर्व उपनगरीय आणि मेट्रो ट्रेनही सुरू झाल्या आहेत.

गतवर्षी कोरोनाच्या प्रकोपाला सुरुवात झाल्यावर देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. तसेच लॉकडाऊनदरम्यान, सर्व उपनगरीय तसेच प्रवासी रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर विशेष गाड्यांच्या रूपात रेल्वे वाहतूक सुरू झाली होती.

दरम्यान, रेल्वेसेवा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झाल्यावर त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. सध्या रेल्वेकडून कोविडकाळात विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांचे प्रवासी भाडे हे अधिक आहे. मात्र आता सर्व मेल, एक्स्प्रेस गाड्यांची वाहतूक सुरू झाल्यावर सर्वसामान्यांना आपल्या सोईप्रमाणे प्रवास करता येणार आहे. तसेच प्रवासासाठीचे शुल्कही कमी होणार आहे.