Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे पेचात? शिवसैनिकांची निष्ठा कमी पडतेय! आदित्य ठाकरेंच्या वरळीत सर्वांत कमी शपथपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 09:07 AM2022-08-18T09:07:28+5:302022-08-18T09:13:02+5:30

Maharashtra Political Crisis: खासदार, आमदार, माजी महापौर, नगरसेवकांची फौज असताना आदित्य ठाकरेंची वरळी शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यात मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या धक्क्यातून अद्यापही शिवसेना सावरताना दिसत नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकामागून एक बैठकांचा सपाटा सुरू असून, आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले आहेत. यातच एकनाथ शिंदे गटाला दिवसेंदिवस राज्यभरातून पाठिंबा वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे.

यातच केंद्रीय निवडणूक आयोगात पक्षचिन्ह टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना खूपच मेहनत घ्यावी लागताना दिसत आहे. तळागाळातील शिवसैनिकांची आपल्यालाच साथ आहे, ते सिद्ध करण्यासाठी शिवसैनिकांकडून शपथपत्र लिहून घेतली जात आहे. मात्र, शिवसेनेची तगडी ताकद मानल्या जाणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातच सर्वांत कमी शपथपत्रे आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खासदार, तीन आमदार, माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेवकांची फौज असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून सर्वात कमी शपथपत्रे गोळा झाली आहेत. एकीकडे भाजपने दहीहंडी उत्सवासाठी जांबोरी मैदान पटकावल्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असताना शिवसैनिकांची शपथपत्रे गोळा करण्यातही वरळी मागे असल्याने पक्षनेतृत्वातून संताप व्यक्त होत आहे.

शिवसेनेतील चिन्ह आणि पक्ष वर्चस्व यावरून सुरू असलेल्या निवडणूक आयोग आणि न्यायालयीन लढाईसाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. शिवसेनेतील खासदार, आमदार, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांना निष्ठा सिद्ध करण्यासाठी शपथपत्र सादर करण्याचे फर्मान काढण्यात आले. त्यानुसार शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालये, शाखांमधून शपथपत्रे तयार करून मुंबईत पाठविण्यात येत आहेत.

शिवसेनेने शपथपत्राचा मसुदा तयार केला असून तो नमूद केलेला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची नोटरी करावी लागत आहे. प्रत्येक निष्ठावंताला स्टॅम्प पेपरसाठी १०० रुपये आणि नोटरीसाठी ५० रुपये खर्च येत आहे. नोटरीसाठी पैसे खर्च होऊ नये यासाठी शिवसेना भवनामध्ये १२ व्यक्तींवर शपथपत्रांची नोटरी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मुंबईतील विविध विभागांमधून शपथपत्र सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत मुंबईमधील वरळी आणि दादर वगळता अन्य विभागांतून प्रत्येकी सरासरी सात हजारांच्या आसपास शपथपत्रे सादर करण्यात आली आहेत. दादर भागातून सुमारे पाच हजारांच्या आसपास शपथपत्रे सादर झाली आहेत. मात्र शपथपत्र सादर करण्यात दस्तुरखुद्द आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघ पिछाडीवर आहे.

वरळी परिसरातून मंगळवापर्यंत केवळ तीन हजार २०० शपथपत्रे सादर झाली आहेत. त्यातच आता वरळीमधील जांबोरी मैदानात भाजपने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे विजयी झाले.

त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुकीत वरळी परिसरातील सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांची वर्णी लागली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेनेचे खासदार अरिवद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदही भूषविले आहे. याच परिसरातून माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि बेस्ट समितीचे अध्यक्षपद चार वेळा भूषविणारे आशीष चेंबूरकर विजयी झाले होते.

मुंबईतील बालेकिल्ल्यांपैकी वरळी एक मानला जातो. मात्र एक खासदार, तीन आमदार, माजी महापौर, ज्येष्ठ नगरसेवक अशी मातबर मंडळी असतानाही वरळी परिसरातून मोठ्या संख्येने शपथपत्र गोळा करण्यात शिवसेनेला अपयश आले आहे.

वरळी परिसरातून नोटरी करण्यासाठी कमी संख्येने निष्ठावंत मंडळी शिवसेना भवनात पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात स्टॅम्प पेपरसाठी कोणी खर्च करायचा असा कळीचा मुद्दा वरळीमध्ये उपस्थित झाला आहे. यासाठी कोणताही मोठा नेता पुढे येत नसल्यामुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाची मातोश्रीने गंभीर दखल घेतली असून या परिसरातील नेते मंडळींना कानपिचक्या मिळू लागल्याचे समजते.