पुन्हा होणार चमत्कार, बाळासाहेबच ठरणार युतीचे शिल्पकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 06:25 PM2019-01-23T18:25:55+5:302019-01-23T18:34:10+5:30

शिवसेना आणि भाजपा यांची युती म्हणजे देशाच्या राजकारणातला एक चमत्कारच मानला जातो. राजकीय पक्षांची मैत्री दोन दशकांहून अधिक काळ टिकल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. त्याचं श्रेय शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना जातं. ही जोडी युतीची शिल्पकार होती आणि ही मैत्री अभेद्य ठेवण्याची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

ही युती सध्या तुटीच्या उंबरठ्यावर असताना, बाळासाहेबांमुळेच शिवसेना-भाजपामधील दरी आणि दुरी मिटू शकत असल्याचं चित्र आज पाहायला मिळालं.

'रिमोट कंट्रोल', 'किंगमेकर' म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. या दिवसाचं औचित्य साधून आज बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. या सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष होतं ते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हावभावांकडे. परंतु, शिवसेना-भाजपामध्ये सगळंच आलबेल असल्यासारखं ते वागले, बोलले आणि बंद दाराआड चर्चाही केली. त्यामुळे बाळासाहेबांच्या साक्षीने, आशीर्वादाने पुन्हा युतीची तुतारी वाजते की काय, असंच अनेकांना वाटून गेलं.

महापौर बंगल्याची जागा बाळासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याचा, या स्मारकासाठी १०० कोटींचा निधी मंजूर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस स्मारकाच्या भूमिपूजनालाही गेले आणि बाळासाहेबांपुढे नतमस्तकही झाले. उद्धव यांनी त्यांना आरतीचा मानही दिला.

ठाकरे कुटुंब, शिवसेनेचे नेते आणि शेकडो शिवसैनिक या सोहळ्याला उपस्थित होते. तो शिवसेनेचा मेळावाच वाटत होता. परंतु, मुख्यमंत्री त्यात अगदी समरसून गेले होते. उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी काही काळ बंद दाराआड चर्चाही केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपा-शिवसेनेचं सध्याचं नातं हे विळ्या-भोपळ्याचंच आहे. त्यांच्यात रोज कुठल्या-ना-कुठल्या विषयावरून 'सामना' रंगतो, रस्सीखेच होते. केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत असूनही शिवसेना रोज नरेंद्र-देवेंद्र सरकारवर टीकेचे बाण सोडतेय. त्यांनी स्वबळाचा नाराही दिला आहे आणि भाजपाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करताहेत.

'चौकीदार ही चोर है' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरात सूर मिळवला होता. त्यामुळे भाजपा नेते खवळले होते. योग्य वेळी उत्तर देण्याचा इशारा स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला होता. स्वाभाविकच, युतीतील तणाव वाढला होता. अर्थात, शिवसेनेशी युती होईल, अशी आशा भाजपाश्रेष्ठींना अजूनही आहे. परंतु, सेना मागे हटायला तयार नाही.

लोकसभा निवडणूक भाजपासोबतच लढावी, असं शिवसेनेच्या काही खासदारांना वाटतंय. त्यांना उद्धव यांनी तंबी दिली. भीती वाटत असेल तर निवडणूक लढवू नका, असं त्यांनी खडसावलंय. त्यातून त्यांचा पवित्रा स्पष्ट दिसतो.

परंतु, आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील स्नेहसंबंध पाहता, अजूनही युती होऊ शकते, असेच संकेत मिळत आहेत. बाळासाहेबांच्या जयंतीच्याच दिवशी घडलेल्या या घडामोडी पुढे कसं वळण घेतात की वळणावळणाचा रस्ता संपून युतीचा मार्ग मोकळा होतो, हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरेल.