"राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत नाही; मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 12:15 PM2021-08-02T12:15:09+5:302021-08-02T14:21:16+5:30

टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत असताना कोरोनाचे निर्बंध शिथिल होणार का? असा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे. या संदर्भात आता महत्वाची माहिती समोर आली आहे.

राज्यात सातत्याने सक्रिय रुग्णांमध्ये घट होताना दिसते आहे. सध्या ७६ हजार ७५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्ण निदानाच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची माहिती समोर आली होती. परंतु निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही, असं मंत्री विजय वडेट्टीवर यांनी सांगितलं आहे.

कोरोना अद्याप संपलेला नाही. ऑगस्टच्या शेवटपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली, असं सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

व्यापाऱ्यांच्या भावना योग्य आहेत. पण कोरोनाच्या बाबतीत ढिलाई महागात पडू शकतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकार सावध पावलं टाकत आहेत. व्यापाऱ्यांचा जीवही महत्त्वाचा आहे, असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात शनिवारी ७ हजार ४७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६० लाख ९० हजार ७८६ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात शनिवारी ६ हजार ९५९ रुग्णांचे निदान झाले असून, २२५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७९ लाख ६७ हजार ६०९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३.१४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

राज्यात ४ लाख ७६ हजार ६०९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ३ हजार १६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात रुग्ण बरे हण्याचे प्रमाण ९६.६२ टक्के झाले असून, मृत्यूदर २.१ एवढा आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ६३ लाख ३ हजार ७१५ झाली असून, १ लाख ३२ हजार ७९१ आहे.

दिवसभरात नोंद झालेल्या २२५ मृत्यूंमध्ये मुंबई ९, ठाणे मनपा २, नवी मुंबई मनपा ५, वसई विरार मनपा ३, रायगड ३, नाशिक ५, नाशिक मनपा ५, मालेगाव २, अहमदनगर १९, अहमदनगर मनपा १, जळगाव २, जळगाव मनपा १, पुणे ४, पुणे मनपा ४, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर ४, सातारा १३, कोल्हापूर ९, सांगली २२, सिंधुदुर्ग ५, रत्नागिरी २५, औरंगाबाद ५९, औरंगाबाद मनपा २, उस्मानाबाद १, बीड ५, यवतमाळ ४, बुलडाणा २, नागपूर १, नागपूर मनपा ६ इ. रुग्णांचा समावेश आहे.