Sachin Vaze: 'तो' NIAने स्वतः निर्माण केलेला एक बनाव; आता वाझेंनीच कोर्टात केला खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 03:19 PM2021-04-04T15:19:38+5:302021-04-04T18:57:13+5:30

Sachin Vaze: सचिन वाझे (Sachin Vaze) यांची कोठडी संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं.

मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या पोलीस कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून मिळालेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझेंच्या पासपोर्टची चौकशी करायची असल्याने वाझेंची कोठडी वाढवून देण्याची मागणी एनआयएने विशेष कोर्टात केली होती. त्यामुळे कोर्टाने वाझेंच्या कोठडीत वाढ केली आहे.

सचिन वाझे यांची कोठडी आज संपल्याने त्यांना एनआयएच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी वाझेंचे वकील आणि एनआयएच्या वकिलांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने एनआयएच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आणि प्रकरणाचं गांभीर्य पाहून वाझेंच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ केली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी (Mukesh Ambani Bomb Scare) भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली त्यानंतर या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृतदेह मुंब्रा येथील खाडीकिनारी सापडला होता, या संपूर्ण प्रकरणानं राज्याच्या वातावरण ढवळून निघालं आहे, मुख्यत: या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIA ने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि पोलीस कर्मचारी विनायक शिंदे हे व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात सहभागी होते, कट रचणाऱ्यांसोबत सचिन वाझे मोबाईलवरून संपर्कात होते. हे षडयंत्र कोणी रचलं आणि हत्येमागे काय हेतू होता इथपर्यंत NIA चा तपास पोहचला आहे असं त्यांनी सांगितलं. NIA कोर्टाने विनायक शिंदे आणि नरेश गोर याला ७ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

कोर्टात वाझेंच्यावतीने देखील युक्तीवाद करण्यात आला. त्यावेळी मुंबईच्या मिठी नदीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएने स्वतः निर्माण केलेला एक बनाव असल्याचा खळबळजनक आरोप शनिवारी सचिन वाझे यांच्यावतीनं विशेष एनआयए कोर्टात केला गेला. तसेच आपल्याला हृदयरोगाचा आजार असून रविवारी एक स्ट्रोक आल्याची माहितीही वाझेंनी स्वत:हून न्यायालयाला दिली.

शनिवारी सचिन वाझे यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आलं होतं. २५ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत एनआयएनं केलेल्या तपासात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. बऱ्याच गोष्टी हस्तगत करण्यात यश आलं आहे. मिठी नदीच्या गाळातून कॉप्युटर, लॅपटॉप, हार्डडिस्क, सीसीटीव्हीचा डीव्हीआर, गाडीच्या नंबर प्लेट्स इ. साहित्य हाती लागले आहे. तर डीसीबी बँकेच्या वर्सोवा शाखेमध्ये एका व्यक्तीसोबत वाझेंचे संयुक्त खातं आहे.

वाझेंना अटक होताच त्या खात्यातील जवळजवळ २६ लाख ५० हजार रूपये काढण्यात आले. तसेच त्याच शाखेत या खात्याशी संलग्न असलेला लॉकरही त्यादिवशी उघडण्यात आला होता. आता त्या खात्यात केवळ 5 हजार रूपये शिलल्क असून लॉकरमध्येही केवळ काही नाममात्र कागदपत्र उरली आहेत.

तसेच एका अनोखळी व्यक्तीचा पाटपोर्टही वाझेंच्या घरी सापडला असल्याची माहितीही एनआयएच्यावतीने अतिरिक्त सॉलिलिटर जनरल अनिल सिंह यांनी दिली. त्याला जोरदार विरोध करत मिठी नदीत सापडलेलं सारं साहित्य म्हणजे एनआयएने स्वतः निर्माण केलेला एक बनाव आहे. तसेच डीसीबी बॅंकेत वाझेंचे कुणासोबतही संयुक्तरित्या खाते नाही असा दावा वाझेंच्यावतीनं करण्यात आला.

मात्र, एनआयएनं त्या खात्यासंदर्भात सारी कागदपत्र असल्याचं सांगत हा विरोध खोडून काढला. तसेच वाझेंवर युएपीए कायद्यांतर्गत कलम लावण्यात आली असून त्यासंबंधित तब्बल १२० टीबीचे सीसीटीव्ही फुटेज हस्तगत करण्यात आले आहे. त्या फुटेजमध्ये वाझे मागील काही दिवसात कुठे गेले? कोणाला भेटले? का भेटले?, स्फोटकांचे सामान कसं गोळा केल?, याचा तपास सुरू असून दुसरीकडे सीसीटीव्हीमधील वाझेंचा संशयास्पद वावर तसेच मिठी नदीच्या पात्रात सापडलेल्या सामानातून डेटा परत मिळवून वाझेंची अधिक चौकशी होणं गरजेचं असल्यानं कोठडी वाढवून देण्यात यावी, अशी मागणी एनआयएच्यावतीनं न्यायालयात केली गेली.