Sachin Vaze: सचिन वाझेंच्या कार्यालयाच्या झडतीदरम्यान NIAला सापडली एक वस्तू; आता तीच करणार मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 10:48 AM2021-03-23T10:48:43+5:302021-03-23T11:50:04+5:30

एनआयएच्या (NIA) पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये एनआयएला अनेक वस्तू मिळाल्या आहेत.

संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सचिन वाझे हाच असून, त्याच्याच इशाऱ्यावरून हे हत्याकांड घडल्याची माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, या हत्या प्रकरणाचा तपास अद्याप एटीएसकडेच असून, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी एनआयएने मुंबई पोलीस दलातील एपीआय सचिन वाझे यांना अटक केली आहे. अटकेनंतर एनआयएच्या (NIA) पथकाने वाझे यांच्या कार्यालयाची झडती घेतली. यामध्ये एनआयएला अनेक वस्तू मिळाल्या आहेत. त्यामधील एक वस्तू मोठे खुलासे करेल असा एनआयएने दावा केला आहे.

एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना सचिन वाझे यांच्या कार्यालयात एक डायरी मिळाली आहे. ज्यामध्ये पैशाच्या व्यवहाराबद्दल एन्ट्री दिसते आहे आणि कोडरवर्डमध्ये ही काही नोंदी दिसस आहेत. बार, रेस्टॉरंट्स आणि इतर गोष्टींमधून गोळा झालेल्या पैशांच्या व्यवहाराची ही डायरी असू शकते, असं तपास यंत्रणांचं मत आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि सोशल सर्विस ब्रांचचे एसीपी संजय पाटील यांना पैसे गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप त्यांनी केला.

वाझे यांच्या अटकेनंतर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी 16 मार्च रोजी सीआययू कार्यालयात छापा टाकला. त्यावेळा त्यांना तेथे लॅपटॉप, मोबाईल, इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि काही कागदपत्रे मिळाली होती. तेव्हा त्याच छापेमारीदरम्यान एनआयएला तिथून एक डायरीही मिळाली ज्यात बऱ्याच पैशाच्या व्यवहारांची नोंद आहे.

तत्पूर्वी, गेले काही दिवस या प्रकरणाच्या तपासासाठी एटीएसचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवदीप लांडे आणि उपायुक्त राजकुमार शिंदे हे ठाण्याच्या कार्यालयात तळ ठोकून आहेत. रविवारी (२१ मार्च) या हत्या प्रकरणात नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींना अटक करण्यात आली. गोर हा क्रिकेट बुकी आहे.

शिंदे निलंबित पोलीस कर्मचारी असून, २००७च्या वर्सोवा येथील लखनभय्या बनावट चकमकीमध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे. याच गुन्ह्यात तो पेरोल रजेवर असताना वाझेसाठी काम करीत असल्याचे समोर आले आहे.

मनसुख हत्या प्रकरणात १० ते ११ आरोपींचा समावेश असून, हत्या नेमकी कोणत्या कारणांमुळे आणि कशी केली, याचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान, विनायक शिंदे याच्या कळवा नाका येथील गोल्ड सुमित या इमारतीच्या तळमजल्यावरील घरी एटीएसच्या एका पथकाने रविवारी आणि सोमवारीही झडती घेतली. त्याचबरोबर त्याच्या घरात चौकशी करून काही कागदपत्रेही ताब्यात घेतल्याचे समजते.

Read in English