मनसुख हिरेन यांची हत्या?; अनिल देशमुख यांच्या ट्विटमधील 'त्या' शब्दाने भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:51 PM2021-03-20T20:51:57+5:302021-03-21T07:16:57+5:30

home minister anil deshmukh tweet said mansukh hiren was murderd: परमबीर सिंग यांचा आरोप देशमुखांनी फेटाळला; पण ट्विटमुळे भुवया उंचावल्या

मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग यांच्या एका पत्रामुळे राज्यात खळबळ माजली आहे. पदभार काढून घेण्यात आल्यानं नाराज झालेले परमबीर सिंग स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचं समजतं.

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केले आहेत.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी मात्र परमबीर सिंग यांचे आरोप फेटाळले आहेत. देशमुखांनी दोन ट्विट करत परमबीर सिंग यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना आणि त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना, परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असं ट्विट अनिल देशमुख यांनी केलं.

परमबीर सिंग यांचे आरोप फेटाळत असताना गृहमंत्र्यांनी दोन ट्विट केली आहेत. यातल्या एका ट्विटमध्ये त्यांनी मनसुख हिरेन हत्या प्रकरण असं म्हटलं आहे. त्यामुळे हिरेन यांची हत्या झाल्याची कबुली खुद्द गृहमंत्र्यांनीच दिली आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भात गंभीर आरोप केले होते. मनसुख हिरेन यांची हत्या झालाचा आरोप फडणवीस यांनी केला होता.

मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमल यांचं एक पत्रच फडणवीसांनी लिहिलं होतं. त्यात विमल यांनी सचिन वाझे यांच्याबद्दल संशय व्यक्त केला होता.

देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांची हत्या झाल्याचा आरोप सर्वप्रथम केला. आता खुद्द गृहमंत्री देशमुख यांनी ट्विटमध्येच मनसुख हिरेन हत्या प्रकरण म्हणत फडणवीसांच्या आरोपाला दुजोरा दिला आहे.

विशेष म्हणजे काल दिल्लीत पत्रकारांशी बोलतानादेखील देशमुख यांनी हिरेन प्रकरणाचा उल्लेख करताना हत्या शब्द वापरला होता.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या कारचा आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एनआयए करत आहे. राज्य सरकार एनआयएला संपूर्ण सहकार्य करेल, असं देशमुख म्हणाले होते.