Bhandup Hospital Fire: ड्रीम मॉल अग्निकांडाच्या तपासाला धक्कादायक वळण; मालकालाही अटक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:22 AM2021-05-21T08:22:25+5:302021-05-21T08:34:53+5:30

Bhandup Hospital Fire: ड्रीम्स मॉलमधील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या सदर घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

मुंबईत विविध ठिकाणी कोविड सेंटर्स तयार करण्यात आले आहेत. अशाच प्रकारे मुंबई पूर्व उपनगरात असलेल्या भांडूप येथील ड्रीम्स मॉलमध्ये सुद्धा एक कोविड रुग्णालय तयार करण्यात आले होते. मात्र, दुर्दैवाने 25 मार्च रोजी या रुग्णालयाला आग लागली आणि यात 11 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला होता.

ड्रीम्स मॉलमधील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या सदर घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईतील भांडुप इथल्या ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांच्या हाती अग्निशमन दलाची काही महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. ज्यामुळे मॉलचे प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

भांडुप पोलिसांकडून करण्यात असलेल्या तपासात धक्कादायक वळण समोर आल आहे. आग लागण्याच्या चार महिन्यांपूर्वी अग्निशमन दलाने ड्रीम मॉलचं फायर इन्स्पेक्शन करुन प्रशासक राहुल सहस्रबुद्धे यांना नोव्हेंबर 2020 मध्ये नोटीस बजावली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई अग्निशमन दलाच्या नोटीसनुसार फायर इन्स्पेक्शनच्या वेळी मॉलमधील फिक्स फायर फायटिंग सिस्टम कार्यरतच नव्हती. मॉलच्या बेसमेंट आणि शेडवर काही भंगार होते. आग लागल्यावर ती विझवण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणंही कार्यरत नव्हती. 2020 मध्ये दिलेल्या नोटीसद्वारे या सर्व गोष्टी व्यवस्थित करण्याची सूचना अग्निशमन दलाने दिली होती.

मुंबई फायर ब्रिगेडने स्पष्ट सांगितलं होतं की दिलेल्या सूचनांचं जर पालन केलं नाही तर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, ज्यामध्ये तीन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडचा समावेश आहे. मात्र तरी देखील अग्निशमन दलाने दिलेल्या सूचनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं, ज्यामुळे निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले.

फायर डायरेक्टर प्रभात रहंगदळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला असून महापालिका आयुक्तांनी यास मंजुरी दिली आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून आतापर्यंत दोघांना अटक केली आहे.

ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांच्या तपासाचा फेरा वाढण्याची शक्यता आहे तसेच लवकरच दुकान क्रमांक 140 चे मालक आणि मॉल प्रशासक यांना सुद्धा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे आपल्या अडचणीत होत असलेली वाढ पाहून राहुल सहस्रबुद्धे यांनी पोलिसांची चौकशी आणि अटकेची शक्यता पाहता कोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी 7 जून 2021 सुनावणी होणार आहे.