'धर्मवीर' सिनेमा पाहण्यापूर्वी दुग्धाभिषेक, मंत्री एकनाथ शिंदेंकडून कटआऊटची विधीवत पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 05:21 PM2022-05-13T17:21:32+5:302022-05-13T17:39:47+5:30

आनंद दिघेंचे कार्य आणि न्यायप्रणाली, त्यांचा जीवनपट या चित्रपटामधून होत आहे. त्यांचे कार्य पोहचवण्याचे काम याठिकाणी होत आहे. मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे. निर्माते मंगेश देसाई,प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा मराठी सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या सिनेमाचा खास शो सकाळी ठाण्यातील व्हिवियाना मॉल येथील सिनेपोलिस मल्टिप्लेक्समध्ये पार पडला.

यासमयी उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचे ढोल आणि लेझीम पथकाच्या तालास्वरात, मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे यांच्या कटआउट समोर विधिवत पूजा करित दुग्धाभिषेक करण्यात आला.

हा सिनेमा आजच्या तरुणाईला धर्मवीर आनंद दिघे साहेबांची खरी ओळख करून देणार असून जास्तीत जास्त लोकांनी तो पहावा, असे आवाहन शिंदे यांनी यासमयी बोलताना केले.

याप्रसंगी खासदार राजन विचारे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे शहर महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे हजर होते.

या सिनेमात आनंद दिघेंची भूमिका साकारणारे अभिनेते प्रसाद ओक, निर्माते मंगेश देसाई, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील यांनीही विधिवत पुजेत सहभाग घेतला.

आनंद दिघेंच्या कटाऊटला दुग्धाभिषेक करुन विधीवत पूजा करण्यात आली. पुष्पहार घालून नमनही केले.

कटआऊटची विधिवत पूजा झाल्यानंतर प्रेक्षकांसह मंत्री एकनाथ शिंदे आणि दिग्गजांनी सिनेमाचा विशेष शो पाहिला.

आजचा दिवस आमच्या साठी मोठा दिवस आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी अनेक वर्षे समाजसेववचे काम केले. अन्यायाविरुद्ध न्याय मिळून दिला. त्यांची आठवण होणार नाही असा एकही क्षण आलेला नाही.

आनंद दिघेंचे कार्य आणि न्यायप्रणाली, त्यांचा जीवनपट या चित्रपटामधून होत आहे. त्यांचे कार्य पोहचवण्याचे काम याठिकाणी होत आहे. मुख्य भूमिका प्रसाद ओक यांची आहे. निर्माते मंगेश देसाई,प्रवीण तरडे व इतर सर्वांचे मोठे काम आहे, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

बाळासाहेब आणि दिघे साहेब यांच्याकडून प्रेरीत होऊनच आम्ही इथे आहोत. युवकांना आणि तरुणांना हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल, सर्वांनी हा चित्रपट पाहावा, असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी केले.

या चित्रपटातील रंगभूषा अफलातून असून त्यासाठी खूप महिनत घेतली गेली आहे. क्षितिज दाते यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.