बालगंधर्व चित्रपटाला १० वर्ष पूर्ण, रवी जाधव जुन्या आठवणीत दंग,सोशल मीडियावर केले शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 12:02 PM2021-05-07T12:02:33+5:302021-05-07T12:17:07+5:30

दिग्दर्शक अभिनेता रवी जाधव हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव. रवी जाधव यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या मराठी सिनेमांचा जोरदार डंका वाजला आहे. हे सिनेमा रसिकांसह समीक्षकांच्या पसंतीस पात्र ठरले.

रवी जाधव सोशल मीडियावरही बरेच सक्रीय असतात. आपले सिनेमा आणि विविध गोष्टींबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून मत मांडतात.

नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर टाकलेले फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोच्या माध्यमातून त्यांनी 'बालगंधर्व' सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

त्याला कारणही तसेच खास आहे.‘बालगंधर्व’ चित्रपट प्रदर्शित होऊन 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना.

संगीत नाटकांच्या जमान्यात संपूर्ण महाराष्ट्रावर गारूड करणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या आयुष्यावर आधारित “बालगंधर्व” हा सिनेमा २०११ साली प्रदर्शित झाला अभिनेता सुबोध भावेने बालगंधर्वांची भूमिका साकारली होती.

'बालगंधर्व' या अजरामर कलाकृतीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही सिनेमाची जादू कायम आहे. नुकतेच दिग्दर्शक रवी जाधव यांनी बालगंधर्व चित्रपटाच्या आठणींना उजाळा दिला आहे.

रवी जाधवने सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर करत म्हटले की, भोरच्या वाड्यामध्ये ३३ दिवस अखंड अहोरात्र काम करण्यासाठी साक्षात बालगंधर्वच आम्हा सर्व टिमला बळ देत होते असे अजूनही वाटते.

ही कलाकृती साकारत असतानाचा प्रत्येक कडू गोड क्षण अजूनही आठवतो. सेट वरच्या गमती जमती, सेट ते हॅाटेल प्रवास, रात्री हॅाटेल मधील गाण्यांच्या महफीली, सेटवरचे टेन्शन… सर्वच या चित्रपटाने खूप काही दिले. नवे मित्र दिले, नवा दृष्टीकोण दिला, नवे बळ दिले. नवा आत्मविश्वास दिला.

केवळ ही दहा वर्षच नाही तर पुढील अनेक दशके मराठी रंगभूमीवरचे हे काही सोनेरी क्षण ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा अनूभवता येतील हे नक्की.

असा अद्भूत विषय व तो साकारायला झटणारी अशी ब्रीलीयंट टिम पुन्हा पुन्हा मिळत नाही. या सर्व टिमला मनापासून नमन आणि प्रेम ❤️

सुबोध भावेने केलेल्या सर्वच भूमिका आतापर्यंत चांगल्याच गाजल्या आहेत. त्यात बालगंधर्व यांचे नाव घेतले जाणार नाही असे होऊच शकत नाही.

स्त्रीरुपात सुबोध भावेला बघून सारेच थक्क झाले होते. इतका सुंदर सुबोध भावे त्या चित्रपटात दिसला होता. सुबोध भावेने साकारलेली भूमिकेला रसिकांनीही भरभरून दाद दिली.

सुबोधला बालगंधर्व या चित्रपटातील भूमिकेसाठी 2012 साली झी गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि 2011 साली मिफ्ता येथे सर्वोत्कृष्ट अभिनेता असा पुरस्कार मिळाला होता.