नारायण राणे राजकीय कारकीर्दीतील दुस-या बंडात यशस्वी होतील का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 05:30 PM2017-09-21T17:30:16+5:302017-09-21T17:52:11+5:30

नारायण राणे यांनी अखेर काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे दुसरे बंड आहे.

स्थानिक शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे.

1968 साली शिवसेनेने त्यांच्याकडे चेंबूरच्या शाखाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली. आपल्या स्वभावाप्रमाणे त्यांनी झोकून देऊन काम केले आणि चेंबूर विभागात शिवसेना वाढवली.

1985 साली त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले. चेंबूरच्या कोपरगावमधून ते महापालिकेवर निवडून गेले.

1990 साली राणेंना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. विधानसभेची निवडणूकही राणेंनी जिंकली. 1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली. त्यानंतर शिवसेनेत नारायण राणे यांचे महत्व वाढू लागले.

3 जुलै 2005 रोजी शिवसेनेतून हाकलपट्टी झाल्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी कणकवलीत झालेल्या पोटनिवडणुकीत नारायण राणेंसमोर शिवसेना उमेदवार परशुराम उपकरांचे डिपॉझिट जप्त झाले.

2008 मध्ये विलासराव देशमुखांच्या जागी अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. राणेंनी त्यावेळी मुख्यमंत्रीपद मिळवण्याचे भरपूर प्रयत्न केले. पण त्यात यशस्वी झाले नाहीत.

2014 मध्ये कुडाळ या त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर राणे सातत्याने स्वपक्षीयांवरच टीका करत होते.

काँग्रेसने राणेंना विधानपरिषदेवर पाठवले. पण तरीही त्यांची नाराजी, अस्वस्थतता दूर झाली नाही.अखेर या सर्व नाराजीतून 21 सप्टेंबर 2017 रोजी राणेंनी काँग्रेसच्या आमदारकीसह पदाचा राजीनामा दिला.